नांदेडवर ओमायक्रोनचे सावट, दक्षिण आफ्रिकेतून आलेले तिघे कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 03:57 PM2021-12-22T15:57:23+5:302021-12-22T15:59:41+5:30
Corona Virus in Nanded : जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसात परदेशातून ३०२ नागरिक आल्याची नोंद करण्यात आली आहे.
- अनुराग पोवळे
नांदेड- नांदेडमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तिघा जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या तिन्ही नागरिकांचे नमुने आता जिनोमिक सिक्वेन्सीन्गसाठी पुण्याच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे ओमायक्रोनचा धोका आता नांदेडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसात परदेशातून ३०२ नागरिक आल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ओमायक्रोनचा अतिधोका असणाऱ्या देशातून आलेल्या नागरिकांची संख्या अधिक होती. परदेशातून आलेले हे तीनशे दोन नागरिक आरोग्य विभागाच्या देखरेखीत होते. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील तिघाजणांना कोरोना झाल्याचे निदर्शनात आले आहे. या सर्वांची चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांना कोरोणाची कोणतीही लक्षणे नव्हती.
हे तीनही रुग्ण हिमायतनगर येथील रहिवासी आहेत. त्यांना आता हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांचे नमुने जिनोमिक स्क्विन्सिंगसाठी आता पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्या रुग्णांच्या अहवाल आता ओमायक्रोनच्या बाबतीत नेमका काय येतो याकडे आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाचे ही लक्ष आहे. जिल्ह्यात नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे यांनी केले आहे. प्रत्येकाने वेळेत लसीकरण करून घ्यावे असेही ते म्हणाले.