काबाडकष्ट करून झोपलेले मजूर कुटुंब आगीच्या भक्ष्यस्थानी; तिघांचा होरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 02:12 PM2019-03-18T14:12:48+5:302019-03-18T14:34:22+5:30
कुटुंबातील केवळ एकजण यातून बचावला
नांदेड : मुखेड तालुक्यातील मुक्रामाबाद येथील अंशावली दर्गाच्या शेजारील वस्तीत कुडाच्या घराला रविवारी रात्री १२.४५ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत घरात झोपलेल्या मजूर कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू झाला.
व्यंकट तिम्मा पवार (वय 39 ) पत्नी रेखाबाई व्यंकट पवाय (वय35 ) त्यांची मुलगी काजल व्यंकट पवार (वय 8 ) सर्व रा मुक्रामाबाद अशी मृतांची नावे आहेत. सुदैवाने व्यंकट यांचा १२ वर्षीय मुलगा करण आगीतून बालंबाल बचावला आहे. तीनही व्यक्तींचा आगीच्या भक्ष्यस्थानी पडून कोळसा झाला आहे.
मुक्रमाबाद येथे माळावरील अंशावली दर्गा भागात मजूर कामगार वर्गाची वस्ती असून या परिसरामध्ये मजूर वर्ग टीनशेड पत्रे झोपड्या घालून राहत आहेत. येथेच व्यंकट तिमा पवार हे आपल्या कुटुंबीयांसोबत राहत. रविवारी दिवसभराच्या मजुरीनंतर पवार कुटुंबीय घरात झोपले होते. अचानक मध्यरात्री गवताच्या भिंती असलेल्या घराला आग लागली. आगीमुळे करणकी झोपमोड झाली आणि त्याने घराबाहेर पडत मदतीसाठी आरडओरडा केला. आवाजाने शेजारी घटनास्थळी धावले मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने पवार कुटुंबियांना वाचवता आले नाही.
आगीपासून पवार कुटुंबातून करण ऐकमेव सुखरूप आहे. तसेच करणचा भाऊ सोनू ( १३ ) हा मजुरीसाठी हैदराबाद येथे गेल्यामुळे तोही यातून बचावला आहे. मात्र, या घटनेमुळे दोन मुले आई-वडिलांपासून पोरकी झाल्याने हळहळ व्यक्त होत आहेत.