जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायती ओडीएफ प्लस घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:23 AM2021-08-19T04:23:34+5:302021-08-19T04:23:34+5:30
भोकर तालुक्यातील नारवट, हदगाव तालुक्यातील साप्ती व लोहा तालुक्यातील पळशी ग्रामपंचायतीने स्वातंत्र्य दिनी हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) ची घोषणा ...
भोकर तालुक्यातील नारवट, हदगाव तालुक्यातील साप्ती व लोहा तालुक्यातील पळशी ग्रामपंचायतीने स्वातंत्र्य दिनी हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) ची घोषणा केली आहे. याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.
हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) मध्ये वैयक्तिक शौचालय बांधकाम व त्याचा वापर करणे, त्याची शाश्वती राखणे, गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करणे, शाळा व अंगणवाडी तसेच सर्व सार्वजनिक संस्थांमध्ये स्वच्छताविषयक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, गाव स्वच्छ ठेवणे आदी कामे करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व गावांनी हागणदारीमुक्त अधिक म्हणून घोषित करण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वर्षा ठाकूर यांनी केले आहे.
चौकट
शाश्वत स्वच्छतेसह सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनावर आता गावस्तरावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिली आहे. हागणदारीमुक्त अधिक म्हणून गावाची घोषणा करताना गावात शौचालयाच्या वापरासह शाश्वत स्वच्छता असणे आवश्यक आहे. तसेच स्वच्छतेविषयी जनजागृतीसाठी हात धुण्याच्या सवयी, कंपोस्ट खड्ड्यांच्या वापराव्दारे बायोडिग्रेडेबल कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, शोषखड्ड्यांव्दारे सांडपाण्याचे व्यवस्थापन, ओडीएफ प्लस बोर्ड तसेच कोरोना विषयक पेंटिंग करुन जनजागृती करण्यात यावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर. पाटील यांनी केले आहे.