नांदेडात ड्रेनेज चेंबरमध्ये उतरलेल्या तीन मजुरांचा गुदमरुन मृत्यू
By श्रीनिवास भोसले | Published: April 4, 2024 07:00 PM2024-04-04T19:00:10+5:302024-04-04T19:19:45+5:30
नांदेड शहरातील मालटेकडी भागात महापालिकेचे मलशुध्दीकरण केंद्र आहे.
नांदेड : गाळ काढण्यासाठी ड्रेनेज चेंबर मध्ये उतरलेल्या तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना नांदेड मध्ये घडली. नांदेड शहरातील मालटेकडी भागात महापालिकेचे मलशुध्दीकरण केंद्र आहे.
खाजगी कंत्राटदारा मार्फत हे मलशुद्धीकरण केंद्र चालवले जाते. या ठिकाणच्या ड्रेनेज चेंबर मध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने आज गाळ काढण्याचे काम सुरू होते. ३५ वर्षीय शंकर माधव वरसवाड रा.खरबी ता.भोकर आणि २५ वर्षीय राजू मेटकर रा . माळटेकडी हे दोघे ड्रेनेज चेंबर मध्ये उतरले. पण गॅसमुळे श्वास गुदमरत असल्याने ते तडफड करु लागले. त्यांना वाचवन्यासाठी ३० वर्षीय गजानन पूयड रा. माळटेकडी हा देखील चेंबर मध्ये उतरला. पण तिघेही श्वास गुदमरून बेशुद्ध पडले . त्यांना शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
वाचवायला गेलेल्या तिसऱ्याचाही मृत्यू
केंद्र शासन पुरुस्कृत अमृत २.० योजने अंतर्गत माळटेकडी SPS (मलउपसा केंद्र) येथे नविन मशिनरीज उभारणीसाठी खाजगी एजन्सीचे सुपरवायझर शिवरामअप्पा गंदीगुडे व २ मजुर यांनी कामास सुरुवात केली. सदरील काम करतांना २ मजुर चेंबरमध्ये उतरुन काम करत असतांना चेंबरमधील गॅसमुळे श्वास कोंडुन गुदमरल्यामुळे सदरील २ मजुर बेशुध्द पडले व त्यानंतर एक नागरिक पुयड हा त्यांचा बचाव करण्यासाठी चेंबरमध्ये उतरला असता तो पण बेशुध्द पडला.
अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले बाहेर
संबंधीत तिघांना महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तात्काळ बाहेर काढुन उपचारासाठी सरकारी दवाखाण्यामध्ये दाखल करण्यात आले. परंतु रूग्णालयात पोहचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.