बंद दरम्यान झालेल्या दगडफेकीत नांदेडमध्ये निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 11:35 AM2018-01-04T11:35:58+5:302018-01-04T11:38:13+5:30
शहरातील आंबेडकरनगर भागात गस्त घालणार्या शिवाजीनगर पोलिसांच्या वाहनावर काही अज्ञातांनी अचानक दगडफेक केली़ या दगडफेकीत वाहनातील पोलिस निरीक्षकासह तीन कर्मचारी जखमी झाले़ जखमींवर श्री गुरु गोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत़
नांदेड : शहरातील आंबेडकरनगर भागात गस्त घालणार्या शिवाजीनगर पोलिसांच्या वाहनावर काही अज्ञातांनी अचानक दगडफेक केली़ या दगडफेकीत वाहनातील पोलिस निरीक्षकासह तीन कर्मचारी जखमी झाले. जखमींवर श्री गुरु गोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत़
आंबेडकरनगर भागात तरुणांचा मोठा जमाव असल्याची माहिती शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक एस़नरवाडे यांना मिळाली होती़ त्यानंतर एक सहायक पोलीस निरीक्षकासह इतर दोन कर्मचार्यांना घेऊन त्या भागात गस्त घालण्यासाठी गेले़ यावेळी ४० ते ५० लोकांच्या जमावाने अचानक त्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यास सुरुवात केली़ काही कळायच्या आत एम़एच़२६ आऱ४१७ या पोलीस वाहनाच्या समोर आणि पाठीमागील काचा फुटल्या़ वाहनातील पोलीस निरीक्षक नरवाडे यांना किरकोळ दुखापत झाली असून सहायक पोलीस निरीक्षक गोविंद मुंडे, पोहेकॉग़णेश कानगुले, पोकॉ़शिवाजी मुंडे यांना जबर दुखापत झाली आहे़ समोरुन दगडफेक करीत जमाव येत असताना, चालक शिवाजी मुंडे यांनी प्रसंगावधान राखून वाहन वळविले़ त्यानंतर वेगाने त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले़ या ठिकाणी जखमींवर उपचार सुरु आहेत़ त्यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास गंगाचाळ भागात एका पोलीस कर्मचार्याला अज्ञातांनी मारहाण केली़ या घटनेनंतर पोलिसांनी या भागात सौम्य लाठीमार केला़
तत्पूर्वी वाघी रस्त्यावर एका दुधविक्रेत्याला मारहाण करुन त्याची दुचाकी जाळण्यात आली़ या घटनेमुळे दोन गट आमने-सामने येऊन तणाव निर्माण झाला होता़ यावेळी काही जणांनी तिरंगा चौकात रास्ता रोको़ यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती़ परंतु आंदोलनकर्त्यांची संख्या वाढल्यानंतर त्यांनी थेट वजिराबाद चौकात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला़ यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली़ परंतु आंदोलनकर्ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते़ त्यानंतर बळाचा वापर करुन पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगविले़