खंडणी घेण्यास आले, पोलीस असल्याची कुणकुण लागताच आरोपींचा गोळीबार; पोलिसांचेही प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 12:05 PM2023-06-30T12:05:25+5:302023-06-30T12:05:49+5:30
एक कोटींची खंडणी, सेटलमेंट दोन लाखांवर; आरोपी- पोलिसांचा एकमेकांवर गोळीबार
मारतळा (जि.नांदेड) : एक कोटी रुपयांची खंडणी मागून २ लाखांवर सेटलमेंट झाल्यानंतर खंडणी घेण्यासाठी गेलेल्या आरोपींना सामान्य वेशात पोलिस असल्याची कुणकुण लागताच आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही आरोपींवर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना २९ जून रोजी दुपारी १ वाजता नांदेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या ढाकणी (ता. लोहा) येथे घडली आहे. पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.
नांदेड शहरानजीक एमआयडीसी परिसरातील ढाकणी हे गाव लोहा तालुक्यात येते. उद्योजक टी. एस. लोहिया यांचे या भागात स्टोन क्रशर आहे. लोहिया यांना काही दिवसांपूर्वी आरोपींनी १ कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर २ लाख रुपयांवर खंडणीखोरांनी सेटलमेंट केले. ही खंडणी घेण्यासाठी गुरुवारी दुपारी साधारणत: १ वाजण्याच्या सुमारास ४ पुरुष व एक महिला कार (क्र.एम.एच.२६/बीएक्स ८७१०) व एम.एच.२६/एपी ५९३८ आणि एम.एच.२६/सीसी ७११३ या क्रमांकाची दुचाकी घेऊन ढाकणी परिसरात असलेल्या स्टोन क्रेशरजवळ आले. खंडणीखोरांनी लोहिया यांच्याशी संपर्क साधला आणि पैशांची मागणी केली. लोहिया यांनी खंडणीची मागणी होत असल्याची माहिती आधीच पोलिसांना दिली होती. त्यामुळे पोलिसांनी या भागात सापळा लावला होता.
पैशांची मागणी झाल्यावर स्टोन क्रशरपासून काही अंतरावर आपली कार (एम.एच.२६/सीई ८८००) उभी केली आहे. त्यात पैसे ठेवले असून, तेथून घेऊन जा, असे लोहिया यांनी सांगितले. मात्र, आरोपींनी तुम्ही पैसे द्या, असा आग्रह धरला. लोहिया यांनी नकार दिल्यानंतर आरोपी स्वत: आणलेली कार घेऊन लोहिया यांच्याकडे कारकडे निघाले. कारमधून उतरत असताना या भागात सामान्य गणवेशातील पोलिस असल्याचे लक्षात येताच, खंडणीखोरांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. आरोपींनी गोळीबार करताच दुसऱ्या बाजूने पोलिसांनीही गोळीबार केला. आधीपासूनच सतर्क असलेल्या पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करीत एका महिलेसह चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळ लोहा तालुक्यातील सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असून, पोलिस निरीक्षक विशाल भोसले यांच्यासह कर्मचारीदेखील घटनास्थळी दाखल झाले होते.
एसपींची घटनास्थळी भेट
या घटनेची माहिती समजताच पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी घटनास्थळी भेट दिली.
रिंदाच्या नावाने खंडणी
आरोपींनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी रिंदाचे नाव घेऊन ही खंडणी मागितल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण होते. मात्र, पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्याने व्यापाऱ्यांसमोरील दहशत कमी होण्यास मदत होणार आहे. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.