भरदिवसा पतसंस्थेत सशस्त्र दरोडा; पाठलाग करत नागरिकांनी एकास पकडले, दिला बेदम चोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 05:42 PM2022-10-01T17:42:34+5:302022-10-01T17:44:35+5:30

एक दरोडेखोराने कॅशियरकडे जात तेथून २ लाख ४ हजार रुपयांची रोकड ताब्यात घेतली.

Thrilling! An armed robbery at a credit institution in broad daylight at Umari, citizens chased and caught a robber | भरदिवसा पतसंस्थेत सशस्त्र दरोडा; पाठलाग करत नागरिकांनी एकास पकडले, दिला बेदम चोप

भरदिवसा पतसंस्थेत सशस्त्र दरोडा; पाठलाग करत नागरिकांनी एकास पकडले, दिला बेदम चोप

googlenewsNext

उमरी (जि. नांदेड) : तालुक्यातील सिंधी येथील कै. व्यंकटराव पाटील कवळे बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या शाखेत सहा दरोडेखोरांनी दिवसाढवळ्या दरोडा टाकला. तलवारींचा धाक दाखवत बँकेमधून २ लाख २ हजार ४९० रुपयांची रोकड पळविली. शनिवारी (दि.१) दुपारी दोन वाजेच्या सुमारास या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या दरोड्यात एक कर्मचारी किरकोळ जखमी झाला असून, पळून जाणाऱ्यांपैकी एका दरोडेखोरास पकडण्यात जमावाला यश आले आहे.

उमरी- नांदेड महामार्गावरील सिंधी गावाजवळ कै. व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्थेची शाखा आहे. तीन दुचाकींवरून सहा दरोडेखोर या बँकेत घुसले. या सर्वांच्या हातात तलवारी व इतर शस्त्रे होती. तलवारीचा धाक दाखवून कॅशिअरजवळील दोन लाख २ हजारांची रोकड घेऊन हे दरोडेखोर पळून गेले. याचवेळी तलवारीने संगणकाची तोडफोड केली व एका कर्मचाऱ्यास जखमी केले. रोकड घेऊन दुचाकीवरून पळून जात असताना घाई गडबडीत एक दरोडेखोर खाली पडला. यावेळी काही कर्मचारी व जमलेल्या नागरिकांनी पाठलाग करून त्याला पकडले. मनजितसिंह किशनसिंह शिरपल्लीवाले (वय २६, रा. नंदिग्राम सोसायटी, नांदेड), असे पकडलेल्या दरोडेखोराचे नाव आहे. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या, तसेच आजूबाजूच्या लोकांचा मोठा जमाव घटनास्थळी जमला. दरोडेखोरास जमलेल्या जमावाने पोलिसांच्या हवाली केले.

दुचाकीवरून पडून एक दरोडेखोर जखमी
घटनेची माहिती मिळताच उमरी येथील पोलीस निरीक्षक मोहन भोसले, नांदेड येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मनजित सिंह हा दरोडेखोर पळून जाताना मोटारसायकलवरून पडल्याने जखमी झाला असून, पोलिसांनी त्यास उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटना घडताच इतर पाच दरोडेखोर दुचाकीवरून परिसरातील गावांच्या दिशेने पळून गेले. सायंकाळी उशिरापर्यंत या दरोडेखोरांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. काँग्रेसचे माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांची ही पतसंस्था असून, नागरिकांमध्ये या घटनेमुळे दहशत पसरली आहे.

Web Title: Thrilling! An armed robbery at a credit institution in broad daylight at Umari, citizens chased and caught a robber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.