थरारक ! धावत्या व्हॅनमध्ये पोलिसांवर हल्ला करून अट्टल गुन्हेगारांचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 04:11 PM2021-12-18T16:11:51+5:302021-12-18T16:12:49+5:30
आरोपींवर नांदेडात आणून त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात येणार होती
नांदेड- जबरी चोरीसह अन्य अनेक गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन आरोपींना सुरत येथील कारागृहातून नांदेडला आणण्यात येत होते. आरोपींनी चालू वाहनातच पोलिस उपनिरिक्षकासह तीन कर्मचाऱ्यांवर हातकडी आणि काठीने हल्ला चढवून पळ काढला. ही घटना १७ डिसेंबरच्या रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास धुळे जिल्ह्यात घडली. या हल्यात उपनिरिक्षकासह इतर तीन कर्मचारी जखमी झाले आहेत.
विमानतळ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरी आणि इतर अनेक गुन्ह्यातील आरोपी नवप्रीतसिंग तारेशसिंगजाट रा.जस्तरवाल, पंजाब आणि मोहित विजश शर्मा रा.प्रितनगर हे एका गुन्ह्यात गुजरात राज्यातील सुरत येथील कारागृहात होते. विमानतळचे पोलिस उपनिरिक्षक एकनाथ गेंदू देवके, पोना.रत्नसागर मिलींद कदम, पोकॉ.नाथराव बाबूराव मुंढे आणि चालक साईनाथ विश्वनाथ सोनसळे हे पोलिस वाहनाने सुरतलागेले होते. या ठिकाणी कारागृहातून या दोघांचा ताबा घेवून त्यांना नांदेडला आणण्यात येत होते.
१७ डिसेंबरच्या रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास त्यांचे वाहन धुळे जिल्ह्यात आले असताना दोन्ही आरोपींनी अचानक हातकडी आणि काठीने पोलिसांवरच हल्ला चढविला. अचानक झालेल्या हल्याने पोलिसही चक्रावून गेले होते. यावेळी एका आरोपीने उपनिरिक्षक देवके यांच्या हाताचा चावाही घेतला. त्यानंतर गाडीतून उड्या टाकत धूम ठोकली. रात्रीच्या वेळी अंधार असल्यामुळे पोलिसांना त्यांचा पाठलागही करता आला नाही. या प्रकरणात देवके यांच्या तक्रारीवरुन धुळे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या हल्यात उपनिरिक्षकासह चार जण जखमी झाले.
मोक्का अंतर्गत होणार होती कारवाई
पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या नवप्रितसिंग जाट आणि मोहित शर्मा हे अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवे होते. त्यांना नांदेडात आणून त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात येणार होती अशी माहिती आहे. परंतु अपुर्या बंदोबस्तात असे कुख्यात आरोपी आणणे पोलिसांच्या अंगलट आले आहे.