प्लॅटफार्मचे तिकीट ५० रुपये, तरीही गर्दी ओसरेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:17 AM2021-03-14T04:17:30+5:302021-03-14T04:17:30+5:30
नांदेड : कोरोनाचे संकट वाढल्यामुळे काही महिने रेल्वेसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यानंतर ती पुन्हा सुरू करण्यात आली. ...
नांदेड : कोरोनाचे संकट वाढल्यामुळे काही महिने रेल्वेसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यानंतर ती पुन्हा सुरू करण्यात आली. परंतु पॅसेंजर गाड्या मात्र बंदच आहेत. रेल्वेस्टेशनवर कमी प्रवाशांची गर्दी व्हावी हा त्यामागील उद्देश आहे. त्यासाठी प्लॅटफार्मच्या तिकीट दरात वाढ करून ते ५० रुपये करण्यात आले आहे. परंतु त्यानंतरही रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी होताना दिसत नाही. तिकीट खिडकीसमोर प्रवासी एकमेकाला खेटूनच उभे राहत आहेत. तर अनेकांना मास्कचाही विसर पडल्याचेच चित्र दिसून आले.
सध्या नांदेड येथून पनवेल, सचखंड, धनबाद, हैद्राबाद ते औरंगाबाद, तिरुपती ते अमरावती एक्स्प्रेस, हैद्राबाद ते जयपूर, पूर्णा ते पाटना एक्सप्रेस, मनमाड ते सिकंदराबा एक्स्प्रेस, जयपूर ते हैद्राबार उत्सव एक्सप्रेस, आदिलाबाद ते मुंबई एक्स्प्रेस, धर्माबाद ते मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस, काचीगुडा ते अकोला आणि काचीगुडा ते नारखेडा अशा एकूण ५९ गाड्या सुरू आहेत. त्यासाठी प्रवाशांसह त्यांच्या नातेवाईक रेल्वेस्टेशनवर गर्दी करीत आहेत. यातील बहुतांश जण प्लॅटफार्म तिकीटही काढत नाहीत.
बिनदिक्तपणे ते फलाटावर गर्दी करतात. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजत असून कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. नांदेड रेल्वेस्टेशनवर सर्वच फलाटावर प्रवाशांची गर्दी दिसून आली. यामध्ये अनेकांनी मास्कही घातले नव्हते.
सध्या दररोज ५९ रेल्वे धावतात
यापूर्वी नांदेड विभागातून साधारणता १३५ गाड्या धावत आहेत. परंतु बहुतांश गाड्या रद्द करण्यात आल्या असून आता केवळ ५९ गाड्या धावत आहेत. पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. आरक्षण करूनच प्रवाशांनी रेल्वे प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्लॅटफाॅर्म तिकीट विक्री नावालाच
प्लटफार्मचे तिकीट वाढवून आता ५० रुपये केले आहे. परंतु बहुतांश प्रवासी हे प्लॅटफार्म तिकीट घेतच नाहीत. तिकीट न घेताच ते आपल्या आप्तेष्टांना निरोप देण्यासाठी फलाटावर बिनदिक्तपणे फिरत असतात. विशेष म्हणजे प्लॅटफार्म तिकीट नसल्यामुळे त्यांची कोणतीही कारवाई होत नाही.
नातेवाइकाला सोडण्यासाठी रेल्वेस्टेशन आलो आहे. दहा मिनिटात गाडी आहे. त्यासाठी ५० रुपयांचे प्लॅटफार्म तिकीट घेणे कसे परवडेल? आम्ही कुटुंबातील चार सदस्य म्हटल्यावर दोनशे रुपये जाणार. दहा मिनिटात गाडी आल्यानंतर आम्ही परत जाणार आहोत. त्यामुळे आम्ही तर प्लॅटफार्म तिकीट घेतले नाही.
- महेश माने नातेवाईक