आजपासून १०७ केंद्रांवर मुक्त विद्यापीठाची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:07 AM2019-05-14T00:07:50+5:302019-05-14T00:08:48+5:30
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेला मंगळवारपासून सुरूवात होत असून नांदेड विभागात तब्बल १ लाख विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत़ ही परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विभागीय कार्यालयाकडून भरारी पथक नेमले असल्याची माहिती उपकुलसचिव चंद्रकांत पवार यांनी दिली़
नांदेड : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेला मंगळवारपासून सुरूवात होत असून नांदेड विभागात तब्बल १ लाख विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत़ ही परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विभागीय कार्यालयाकडून भरारी पथक नेमले असल्याची माहिती उपकुलसचिव चंद्रकांत पवार यांनी दिली़
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी़ ए़ , बी़ कॉम़ , पदवी परीक्षेला १४ मे पासून सुरूवात होत आहे़ नांदेड विभागीय कार्यालयातंर्गत येणाऱ्या नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या चार जिल्ह्यात एकूण १०७ परीक्षा केंद्र असून जवळपास १ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत़ पूर्वी मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात कॉपीचे प्रमाण होते़ यावर प्रतिबंध घालण्यासाठी विभागीय स्तरावरून उपाययोजना करण्यात आल्या आहेत़ जी परीक्षा केंद्र संवेदनशील होती, असे परीक्षा केंद्र बदलण्यात आले आहेत़ अचानक परीक्षा केंद्र बदलल्यामुळे कॉपी करणाºया केंद्राची मोठी पंचाईत झाली आहे़ परीक्षा केंद्रावर नाशिक विद्यापीठाकडून बहि:स्थ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत़ शिवाय चार जिल्ह्यांत वेगवेगळे भरारी पथक नेमण्यात आले आहेत़
गैरप्रकार करणा-याविरुद्ध करणार कारवाई
मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा या कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्रांना सूचना दिल्या असून विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना आपले प्रवेश पत्र सोबत घेवून जाणे आवश्यक आहे़ याव्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचे पुस्तके, झेरॉक्स कागद सोबत घेवून जाऊ नये़ परीक्षेत गैरप्रकार करणा-या विद्यार्थ्यांविरूद्ध कारवाई केली जाईल, असे उपकुलसचिव चंद्रकांत पवार यांनी सांगितले.