नायगाव, भोकरसह नांदेडमध्ये आज सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:58 AM2018-10-26T00:58:19+5:302018-10-26T00:58:27+5:30
केंद्र आणि राज्य सरकारकडून जनतेवर अन्याय सुरु आहे. या अन्यायाला वाचा फोडून जनसामान्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरु आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : केंद्र आणि राज्य सरकारकडून जनतेवर अन्याय सुरु आहे. या अन्यायाला वाचा फोडून जनसामान्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरु आहे. २६ रोजी सकाळी १० वा. नरसीहून यात्रेचा प्रारंभ होणार असून सकाळी १०.३० ते १२ या वेळेत नायगाव येथे जाहीर सभा, १२ ते १२.४५ हा वेळ राखीव असून १२.४५ वाजता या यात्रेचे भोकरकडे प्रयाण होणार आहे. दुपारी ३ ते ४.३० या वेळात भोकर येथे जाहीर सभा होईल. त्यानंतर यात्रा ४.३० वा.नांदेडकडे प्रयाण करणार आहे. सायं. ६ वाजता जनसंघर्ष यात्रेचे सिडको येथे आगमन होईल. सिडकोहून ही यात्रा दूधडेअरीमार्गे माकंर्डेय चौक, धनेगाव चौक, वाजेगाव चौक, जुना पूल, देगलूर नाका, बाफना, भगतसिंग रोड मार्गे जुना मोंढा टॉवर, गुरुद्वारा चौक, महावीर चौक, वजिराबाद भागातील मुथा चौक, कलामंदिर, शिवाजीनगर, आयटीआय, श्रीनगर, वर्कशॉपमार्गे अशोकनगर, भाग्यनगर, आनंदनगर चौकमार्गे महादेव दालमील, व्हीआयपी रोड अशी फिरुन या यात्रेचे नवा मोंढा मैदानावर जाहीर सभेत रुपांतर होणार आहे. सायं. ७ ते १० या वेळेत नवा मोंढा मैदानावर जाहीर सभा होणार आहे. २७ रोजी ही यात्रा सकाळी ९ वा. नांदेडहून निघेल. ९.३० वा. अर्धापूर, लहान, तामसामार्गे दुपारी १ वा. हदगाव येथे जाणार असून हदगाव येथे जाहीर सभा झाल्यानंतर या यात्रेचे प्रस्थान हिंगोली जिल्ह्याकडे होणार आहे.
दरम्यान, नांदेडमधील नवीन मोंढा मैदानावर सायंकाळी सात वाजता होणाऱ्या जाहीर सभेची काँग्रेसच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून ही सभा अभूतपूर्व होण्याची शक्यता आहे. जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने अवघे नांदेड शहर काँग्रेसमय झाले आहे.
यात्रेमुळे नांदेडमधील वाहतूक मार्गात बदल
नांदेड शहरात शुक्रवारी काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा येत आहे. यात्रेच्या निमित्ताने शहराच्या विविध भागातून रॅली निघणार आहे. रॅलीमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये तसेच कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहरातील पर्यायी मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. यानुसार वर्कशॉप टी पाँईट ते आयटीआय, फुलेमार्केट, कुसुमताई चौक, एसटी ब्रीज,कलामंदिर, वजिराबाद चौ रस्ता या मार्गावरील वाहतूक सायंकाळी सहा ते दहा या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे. वाहतुकीसाठी पर्यायी बदल म्हणून तिरंगा चौक ते पोलीस मुख्यालय समोरुन पोलीस चौकीकडून खडकपु-याकडे जाणारा लालवाडी अंडरब्रीज, गणेशनगर वाय पाँईट, पावडेवाडीनाका चालू राहील. तसेच वर्क टी पाँईट ते भाग्यनगर कमान, आनंदननगर चौक, नाईक चौक, महाराणा प्रताप चौक,रेल्वे ओव्हर ब्रीज, बाफना टी पाँईट, देगलूरनाका, वाजेगाव हा मार्ग सुरु राहील.