पाण्याअभावी शौचालये कुलूपबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:00 AM2019-06-19T00:00:40+5:302019-06-19T00:01:54+5:30
सध्या शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून शौचालयांसाठी पाणी कुठूुन आणायचे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे पाण्याअभावी शौचालये कुलूपबंद असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.
बिलोली : सध्या शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून शौचालयांसाठी पाणी कुठूुन आणायचे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे पाण्याअभावी शौचालये कुलूपबंद असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.परिणामी महिला व लहान मुलांना उघड्यावर शौचास जाण्याची वेळ आली.
गतवर्षी सुरुवातीला बऱ्यापैकी पाऊस झाला, मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकेही बहुतांश शेतकऱ्यांच्या पदरात पडली नाहीत. त्यांनी खते-बियाण्यांसाठी टाकलेला खर्चही निघाला नाही. त्याचा परिणाम पर्जन्यमान कमी असल्याने फेब्रुवारी महिन्यापासूनच भूगर्भातील पाणीपातळीत घट झाल्याने एप्रिल, मे महिन्यात अतिशय गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.
सद्य:स्थितीला शहरालगत असलेले तलाव, विहिरी कोरडेठाक पडले तर ग्रामीण भागातील बोअर, हातपंपासह पाण्याचे अनेक स्त्रोत बंद झाले झाले आहेत. त्यामुळे बिलोली तालुक्यात सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उपलब्ध पाणीसाठ्याची स्थिती पाहिल्यानंतर ग्रामीण भागातील अनेक गावांत शौचालयाचा वापर बंद करत कुलूपबंद केले आहे. त्यामुळे पुन्हा उघड्यावर शौचास जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
शासनाकडून विविध योजनेअंतर्गत प्रोत्साहन म्हणून आर्थिक सहाय्य देत प्रत्येक गावात घर तिथे शौचालय, या उक्तीप्रमाणे अनेक गावांत शौचालयांची कामे करुन हागणदारीमुक्त गावे म्हणून घोषित करण्यात आली. परंतु, पाणीच नसल्याने शौचालये निरुपयोगी ठरत आहेत.
यासाठी प्रत्येकाने पावसाळ्यात पडणाºया पाण्याचे योग्य नियोजन करुन पाण्याची साठवणूक करुन ठेवावी. तसेच उन्हाळ्यात पाण्याची कमतरता पडणार नाही, यासाठी बोअरवेल पुनर्भरण, विहीर पुनर्भरण, शोषखड्डे यांचा वापर करुन पाणी जमिनीत मुरवावे लागणार आहे. अन्यथा येत्या उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
तालुक्यातील हागणदारीमुक्त कागदावरच !
बिलोली तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गावांनी शौचालयांचे बांधकाम करुन गावे हागणदारीमुक्त झाल्याचे कागदोत्री दाखवून शासनाकडून अनेक पुरस्कारही मिळविले आहेत. परंतु, सध्यातरी ग्रामीण भागात अतिशय कमी प्रमाणात शौचालयाचा वापर करण्यात येत असल्याने हागणदारीमुक्ती कागदावरच असल्याचे पहावयास मिळत आहे.
सद्य:स्थितीला शहरालगत असलेले तलाव, विहिरी कोरडेठाक पडले तर ग्रामीण भागातील बोअर, हातपंपासह पाण्याचे स्त्रोत बंद झाले झाले आहेत.