असना नदीच्या पुरात शेतातून चारा घेऊन येणारा मुलगा बैलगाडीसह वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 08:40 PM2021-09-23T20:40:15+5:302021-09-23T20:42:42+5:30
Aasana River Flood : नदीपलीकडील शेतातून चारा घेऊन येत असतांना अचानक नदीला पूर आला
- गोविंद टेकाळे
अर्धापूर ( नांदेड) : ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने सायंकाळी असना नदीला अचानक पूर आला. या पुरात एक मुलगा बैलगाडीसह वाहून गेला असल्याची घटना पिंपळगाव महादेव येथे उघडकीस आली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे तात्काळ शोध कार्य सुरू केले. पुरात वाहून गेलेले बैल मृतावस्थेत सापडले असून मुलाचा शोध सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, गुरूवारी सायंकाळी अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील असना नदीला ढगफुटी सदृश्य पावसामुळे पूर आला.नदीपलीकडील शेतातून चारा घेऊन येत असतांना या पुरात पिंपळगाव महादेव येथील निवृत्ती बालासाहेब कल्याणकर यांच्या शेतातील शेतमजूर यांचा मुलगा सुदर्शन इरबाजी झुंजारे ( मुळगाव बळेगाव ता.नायगाव ) हा शेताकडुन बैलगाडी घेऊन येत असतांना अचानक पाण्याच्या प्रवाह वाढल्याने तो वाहून गेला. ही घटना माहिती होताच अर्धापूर पोलिस व महसुल प्रशासन आणि अग्निशामक विभागाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अग्निशमन दलाची एक गाडी बोट व जवानांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत मुलाची शोध मोहीम सुरू होती.
यावेळी घटनास्थळी उपविभागिय अधिकारी विकास माने, महसुल साहाय्यक गरूडकर, तहसीलदार उज्वला पांगरकर ,नायब तहसीलदार मारोतराव जगताप, पोलिस निरीक्षक अशोक जाधव,संजय खिल्लारे,तलाठी चंद्रकांत महाजन,संतोषराव कल्याणकर,कपिल दुधमल,उध्दवराव कल्याणकर,अजय देशमुख व ग्रामस्थ आदींचे घटनास्थळी मदत कार्य सुरू होते.