सव्वाशे वर्षांची परंपरा खंडित होणार; यंदा ग्रामीण जीवनाचे अस्सल दर्शन घडविणारी भाजीभाकर पंगत रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 06:43 PM2021-01-01T18:43:33+5:302021-01-01T18:45:29+5:30
Bhajibhakari Pangat at Tamasa, Nanded : तामसा येथील या भाजीभाकरी पंगतीचा प्रसाद घेण्यासाठी महाराष्ट्रासोबतच विदर्भ, तेलंगणा राज्यातूनही दरवर्षी भाविक हजेरी लावत असतात.
नांदेड : हदगाव तालुक्यात मागील सव्वाशे वर्षांपासून मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी भाजीभाकरी पंगत घेण्यात येते. राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक समतेचा संदेश देत ग्रामीण जीवनाचे अस्सल दर्शन घडविणारी ही पंगत यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. तामसा येथील बारालिंग मंदिराच्या विश्वस्त समितीकडून ही माहिती देण्यात आली.
तामसा येथील या भाजीभाकरी पंगतीचा प्रसाद घेण्यासाठी महाराष्ट्रासोबतच विदर्भ, तेलंगणा राज्यातूनही दरवर्षी भाविक हजेरी लावत असतात. या पंगतीची तयारी साधारण महिनाभरापासून सुरू असते. मात्र, यंदा हजारोंची होणारी गर्दी लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून ही पंगत रद्द केल्याचे संस्थानचे अध्यक्ष संतोष निलावार यांनी सांगितले. विश्वस्त समिती व पंगत व्यवस्थापन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भाजीभाकरी पंगतीची परंपरा खंडित होण्याचे दु:ख असले तरी नागरिकांच्या जीविताची काळजी करणे आवश्यक असल्याने प्रशासनाच्या सूचनेनुसार हा निर्णय घेतल्याचे निलावार यांनी सांगितले. बैठकीला मंदिराचे पुजारी रेवणसिद्ध कंठाळे महाराज, पंडित पाटील, कोषाध्यक्ष अनंतराव भोपळे, श्रीपाद लाभशेटवार, प्रदीप बंडेवार, लक्ष्मण देशमुख, रविकुमार बंडेवार, विश्वंभर परभणीकर, आदी उपस्थित होते.
पाचजणांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम
यंदाची भाजीभाकरी पंगत रद्द करण्यात आली असल्याने भाविकांनी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी मंदिराकडे दर्शन किंवा प्रसादासाठी येऊ नये. देवस्थान समितीकडून प्रातिनिधिक स्वरूपात या दिवशी पाचजणांच्या उपस्थितीत श्रीला अभिषेक व प्रसाद दाखविला जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.