परराज्यातील वाहतूक ठेकेदारांचा काढता पाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:50 AM2019-05-23T00:50:43+5:302019-05-23T00:51:05+5:30
तेलंगणा सीमावर्ती मांजरा नदीच्या वाळूघाटांना यावर्षी घरघर लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दंडात्मक व पोलीस कारवाईच्या भीतीने विशेषत: तेलंगणा व कर्नाटक येथून रेतीसाठी येणारे ट्रकमालक धास्तावले आहेत़ वाळू भरण्यासाठी अनेक ट्रकचालक- मालक नकार देत आहेत.
सगरोळी : तेलंगणा सीमावर्ती मांजरा नदीच्या वाळूघाटांना यावर्षी घरघर लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दंडात्मक व पोलीस कारवाईच्या भीतीने विशेषत: तेलंगणा व कर्नाटक येथून रेतीसाठी येणारे ट्रकमालक धास्तावले आहेत़ वाळू भरण्यासाठी अनेक ट्रकचालक- मालक नकार देत आहेत. वाळू उपशास प्रारंभ होऊन पंधरा ते वीस दिवस झाले. परराज्यातील दरवर्षी मोठ्या प्रमाणात येणारे ट्रक यावर्षी बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहेत.
मराठवाडा - तेलंगणा व कर्नाटक राज्याला दुभंगणारी मांजरा नदी लालस्फटिक आकाराच्या वाळूसाठी प्रसिद्ध आहे. राज्याच्या कोपºयात असलेल्या मांजरा नदीपात्रात शासकीय व खाजगी असे जवळपास २० ते २५ वाळूघाट आहेत. दरवर्षी पावसाळा संपला की, सर्व घाटांचा लिलाव केला जात होता. पाच वर्षांपासून आॅनलाईन -ई- लिलाव, ई - निविदा पद्धती अंमलात आलेली आहे. सन २०१८-२०१९ अंतर्गत सगरोळी परिसरातून माचनूर, गंजगाव, बोळेगाव, हुनगुंदा, कार्ला (बु.), सगरोळी शासकीय घाटांचा लिलाव ठेवण्यात आला होता. पण प्रत्यक्षात मांजराच्या तीनच घाटांना ठेकेदार मिळाले. बोळेगाव व कार्ला घाटाचे ठेकेदार रेती उत्खननास सुरू झालेल्या घाटाची स्थिती पाहून आपले घाट बंदच ठेवले आहेत.
यावर्षी घाट सुरूवात झाल्याच्या प्रारंभीच जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी देगलूर येथे बनावट पावत्यांच्या संशयावरून २८ ट्रकवर दंडात्मक कारवाई केली. तर बिलोलीचे उपजिल्हाधिकारी अमोलसिंह भोसले यांनी सगरोळी घाटावरील अमर्याद वाळू वाहतुकीचे दोन ट्रक व माचनूर येथील तीन जेसीबीवर दंडात्मक कारवाई करून नियमबाह्य उत्खनन चालू देणार नाही, याची चुणूक दाखवून दिली.
बिलोलीचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी दैनंदिन फिरते व बैठे पथक नेमून सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंतच उत्खनन करता येईल अन्यथा कार्यवाहीला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला़ शिवाय पोलीस अधीक्षक संजय जाधव व नुरूल हसन यांच्या कारवाईचा दणका सुरुच आहे. यावर्षीच्या रेती ठेकेदारांची मोठी अडचण झाली आहे़ कित्येकदा वाहतूक करणाºया ट्रकची आडवा- आडवी व पकडून देण्याचे प्रकारही झाले. परराज्यातील ट्रकचालक -मालक यांच्यावर गुन्हे दाखल झाले. आता हे ट्रकचालक - मालक न्यायालयाचे खेटे मारत आहेत.
जुने ठेकेदार गेले, नवीन ठेकेदार आले अशी स्थिती सध्या घाटांची झाली आहे. एकूणच परराज्याच्या वाळू वाहतुकीवर अवलंबून करोडो रुपये गुंतवणूक करणारे ठेकेदार सध्या अडचणीत सापडले आहेते. वाळूसाठा उपलब्ध आहे ; पण अन्य राज्यांतील ट्रक येत नसल्याने घाटांना घरघर लागली आहे. तर दुसरीकडे अनेक घाटांवर दिवसरात्र अवैध वाळू उपसा सुरुच असून प्रशासनाचा महसूल मात्र बुडत आहे़
दहा वर्षांपासून बिलोलीतून वाळू उपसा
सगरोळी परिसरातील मांजरा नदीच्या वाळूघाटातील लाल वाळू खत कारखान्यासाठीही वापरली जाते. सार्वजनिक व खाजगी बांधकामासाठी या वाळूला प्रथम पसंती आहे. तेलंगणात वाळू उपशाला बंदी आहे.
खाजगी वाळू पट्ट््यासाठी मोठा आटापिटा त्या राज्यात करावा लागतो. दोन्ही राज्यांत वाळू वाहतूक व उपशाकरिता अनंत अडचणी असल्याने मागच्या दहा वर्षांपासूून बिलोलीच्या वाळू घाटांना महत्त्व आलेले आहे.