...आता प्रवाशांना मोबाईलवरच मिळणार रेल्वे तिकिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 05:29 PM2018-07-14T17:29:33+5:302018-07-14T17:30:17+5:30

रेल्वे प्रवाशांना आता तिकिट काढण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज नसून मोबाईल अ‍ॅपद्वारे तिकिट काढण्याची सुविधा दक्षिण मध्य रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे़

Train tickets will now get passengers on mobile | ...आता प्रवाशांना मोबाईलवरच मिळणार रेल्वे तिकिट

...आता प्रवाशांना मोबाईलवरच मिळणार रेल्वे तिकिट

Next
ठळक मुद्देसदर अ‍ॅप १५ जुलै रोजी रात्री १२ वाजेपासून प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहे

- श्रीनिवास भोसले

नांदेड : रेल्वे प्रवाशांना आता तिकिट काढण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज नसून मोबाईल अ‍ॅपद्वारे तिकिट काढण्याची सुविधा दक्षिण मध्य रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे़ सदर अ‍ॅप १५ जुलै रोजी रात्री १२ वाजेपासून प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर यांनी पत्रकार परिषदेत दिली़ 

रेल्वे प्रवाशांना तिकिट काढण्यासाठी तिकिट खिडकी अथवा एटीव्हीएम मशीनसमोर प्रवाशांना रांगेत थांबूनच तिकिट घ्यावे लागत होते़ त्याचबरोबर स्थानकात येण्यास उशीर झाल्यास मोठ्या रांगेत उभे राहून तिकिट मिळविणे कठीण असल्याने अनेकवेळा विनातिकिट प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येत होती़ त्यातच तिकिट निरिक्षक अथवा विशेष पथकाने तपासणी केल्यास दंड अथवा शिक्षेस सामोरे जावे लागत होते़ परंतु, स्मार्ट फोनचा वाढता वापर लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांना मोबाईल अ‍ॅपद्वारे  कॅश आणि पेपरलेस तिकिट देण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानूसार रेल्वे प्रशासनाने युटीएस नावाचे एक मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे़ या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवाशांना मोबाईलवरच तिकिट काढता येणार आहे आणि तेच तिकिट दाखवून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे़ 

असे वापरा ‘युटीएस’ अ‍ॅप
प्रवाशांनी अनारक्षित तिकिट घेवून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी स्मार्ट फोनमध्ये युटीएस नावाचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करून घ्यावे, त्यानंतर स्वत:ची माहिती त्यात आपला मोबाईल क्रमांक, नाव, जन्मतारिख, ओळखपत्र आदी माहिती भरून नोंदणी करावी लागेल़  सुरक्षितेसाठी पासवर्ड पण देता येईल़ त्यानंतर आर-वॉलेट तयार होईल़ त्यातून तिकिटाचे पैसे द्यायचे आहेत़ या आर- वॉलेटला आॅनलाईन रिचार्ज करता येईल़ शंभर रूपयांपासून ते १० हजार रूपयापर्यंतचे रिचार्जची सुविधा उपलब्ध असल्याचे वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर यांनी सांगितले़ सदर अ‍ॅप माध्यमातून १ ते चार जणांचे सर्वसाधारण तिकिट काढता येवू शकणार आहेत़ 

मोबाईल अ‍ॅपचे फायदे
सदर मोबाईल अ‍ॅप दक्षिण मध्य रेल्वे झोनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वापरता येणार असून स्थानकापासून ५ किलोमिटरापर्यंत तसेच रेल्वेस्थानकापासून किमान १५ मिटर दूर अंतरावरून तिकिट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ अ‍ॅपच्या माध्यमातून सर्वसाधारण, सीजन, फलाट फार्म तिकिट, द्वितीय श्रेणी तिकिट काढता येवू शकते़ परंतु, एकदा काढलेले तिकिट रद्द करता येत नाही़ त्याचबरोबर रेल्वेस्थानकापासून १५ मिटर अंतरापर्यंत सदर अ‍ॅपचा उपयोग घेवून तिकिट काढता येत नाही़ त्यामुळे किमान १५ मिटर दूर असणे गरजेचे आहे़ तिकिट तपासणीसांना वेगळे अ‍ॅप दिले असून ते त्याद्वारे तिकिट तपासणी करू शकतात़ 

Web Title: Train tickets will now get passengers on mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.