लाइन ब्लॉकमुळे नांदेड स्थानकावरून ऐनवेळी रेल्वेगाड्या रद्द, प्रवाशांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 05:44 PM2024-08-31T17:44:23+5:302024-08-31T17:44:36+5:30
मागील ३० दिवसांत नांदेड स्थानकावरून जाणाऱ्या सात ते आठ रेल्वेगाड्या रद्द
नांदेड : मध्य रेल्वेच्यानांदेड विभागासह महाराष्ट्रातील अनेक स्थानकांवर रेल्वेस्थानकांचे, तसेच रेल्वेलाइन विद्युतीकरणाचे काम सुरू असल्याने मागील काही दिवसांपासून लाइन ब्लॉकमुळे नांदेड स्थानकावरून जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या ऐनवेळी रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्याचा मानसिक व आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे.
मागील ३० दिवसांत नांदेड स्थानकावरून जाणाऱ्या सात ते आठ रेल्वेगाड्या १ ऑगस्टपासून आजपर्यंत रद्द केल्या असून, काहींचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे. ऐनवेळी गाडी रद्द झाल्याचा मेेसेज प्रवाशांना येत असल्याने त्यांची मोठी पंचाईत होते. अनेकदा गाडी सुटण्याच्या काही तास अगोदरच प्रवाशांना गाडी रद्द झाल्याचा किंवा गाडीचा मार्ग बदलल्याचे समजत असल्याने प्रवासासाठी नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो अन् तसेच कामेही खोळंबतात. रेल्वे व्यवस्थापनाकडून रेल्वेगाड्या रद्द करताना तांत्रिक कारण दिले जाते, तर कधी पटरीच्या देखभाल, दुरुस्तीसाठी रोलिंग कॉरिडोर ब्लॉक घेण्यात येतो.
रेल्वे पटरीच्या देखभाल, दुरुस्तीकरिता नांदेड-मनमाड एक्स्प्रेस, तसेच नांदेड- रायचूर एक्स्प्रेस १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२४ दरम्यान, अंशत: रद्द करण्यात आली. याशिवाय केसीजी नगरसोल ही गाडी २३ ऑगस्टला रद्द करण्यात आली. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी धावणारी नांदेड-आदिलाबाद-नांदेड ही इंटरसिटी एक्स्प्रेही काही तांत्रिक कारणांमुळे रद्द केली आहे. त्यानंतर १८ आणि २५ सप्टेंबर रोजी धावणारी जालना-छपरा-जालना या रेल्वेगाड्या दोन फेऱ्या रेल्वे लाइनच्या ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्या आहेत.
प्रवाशांपुढे निर्माण होतात अडचणी
प्रवास करण्यासाठी तिकीट बुकींग कन्फर्म व्हावे यासाठी प्रवासी पंधरा दिवस, एक महिन्याआधीच तिकीट काढून ठेवतात; पण गाडी सुटण्याआधी काही दिवस किंवा काही तास शिल्लक असताना रेल्वेगाडी रद्द झाल्याचा मेसेज प्रवाशांना पाठवला जातो. त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना प्रवाशांना करावा लागतो आहे.