ट्रामा केअर युनिट अखेर मार्गी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 12:25 AM2019-01-06T00:25:05+5:302019-01-06T00:25:54+5:30
माहूर या तीर्थक्षेत्रावरील ट्रामा केअर सेंटरची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. याविषयी नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी आरोग्यमंत्र्यांची व सहसंचालक आरोग्य सेवा रुग्णालये (राज्यस्तर) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तीर्थक्षेत्र माहूरमध्ये आवश्यक असलेल्या ट्रॉमा केअरसंदर्भात निवेदन सादर केले होते.
श्रीक्षेत्र माहूर : माहूर या तीर्थक्षेत्रावरील ट्रामा केअर सेंटरची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. याविषयी नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी आरोग्यमंत्र्यांची व सहसंचालक आरोग्य सेवा रुग्णालये (राज्यस्तर) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तीर्थक्षेत्र माहूरमध्ये आवश्यक असलेल्या ट्रॉमा केअरसंदर्भात निवेदन सादर केले होते. त्या निवेदनाच्या अनुषंगाने सहसंचालकानी उपसंचालक लातूर यांना एका पत्राद्वारे स्वंयस्पष्ट प्रस्ताव अभिप्रायासह संचालनालयास सादर करण्याचे आदेशित केले आहे.
माहूर हे तीर्थक्षेत्र असून शहराची लोकसंख्या २५ हजारांच्या घरात आहे. तालुक्यातील ९२ गावांतील दोन लाख नागरिक व भाविकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी माहूर येथे एकमेव शासकीय ग्रामीण रुग्णालय आहे. दैनंदिन आवागमन करणाऱ्या भाविकांच्या आरोग्य सुविधेसाठी व तालुक्यातील गोरगरीब, दीन- दलित, आदिवासी, बहुजन नागरिकांच्या सेवेसाठी माहूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळणे व ट्रामा केअर सेंटरची आवश्यकता आहे. मागील काळात आ. प्रदीप नाईक, नगराध्यक्ष फिरोज दोसाणी नगरसेवक इलियास बावाणी यांनी आरोग्य उपसंचालक लातूर ते मुख्य संचालक, आरोग्यमंत्र्यापर्यंत पाठपुरावा केला होता.
या सर्व बाबींचा उल्लेख करून नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी ट्रॉमा केअरसाठी संबंधितांना निवेदन दिले होते. त्या निवेदनाची दाखल घेत ट्रॉमा केअर युनिट मंजुरीबाबत शासनाचे पत्र क्रमांक संकीर्ण २०१८/सं.क्र.२२४(२)आ - ४ दिनाक ५/९/१८ चे संदर्भ देऊन सहसंचालक आरोग्य सेवा रुग्णालये (राज्यस्तर) यांनी उपसंचालक लातूर यांना लोकसंख्या, नॅशनल व राष्ट्रीय महामार्गाबाबतची माहिती व अंतर अपघाताचे ३ वर्षांचे प्रमाणपत्र, उपलब्ध शासकीय रुग्णालयाचे अंतर, स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी, जागेची उपलब्धता इत्यादी आवश्यक बाबींचा समावेश करून तसा स्वयंस्पष्ट प्रस्ताव अभिप्रायासह आरोग्य संचालनालय मुंबईकडे सादर करावा, असे आदशित केल्याने रेंगाळत पडलेले ट्रॉमा केअर युनिट मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.
ग्रामीण रूग्णालयाची इमारत झाली जीर्ण
- आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत माहूर दौ-यावर आले तेव्हाही त्यांची शिष्टमंडळाने भेट घेतली होती. मात्र माहूर या तीर्थक्षेत्रावरील ट्रामा केअर सेंटरच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा मिळाल्या. याशिवाय आहे त्या ग्रामीण रुग्णालयाची अवस्था अत्यंत बिकट असून संपूर्ण इमारत जीर्ण झाली आहे.
- माहूर हे तीर्थक्षेत्र असल्याने दररोज हजारो वाहने माहुरात येतात़ अशा वेळी अनेक छोटे, मोठे अपघात होत असतात़ मात्र येथे ग्रामीण रुग्णालयात हव्या त्या सेवा उपलब्ध नसल्याने येथील वैद्यकीय अधिकाºयांना नाईलाजाने रुग्णांना पुसद, यवतमाळ, नांदेडकडे रेफर करावे लागते.