आधी बदली; मग प्रमाेशन, पुन्हा बदली झाल्याने पाेलिस अधिकारी अस्वस्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 04:38 PM2023-05-06T16:38:20+5:302023-05-06T16:38:52+5:30
काैटुंबिक अडचणी वाढणार असल्याचा सूर
राजेश निस्ताने
नांदेड : राज्य पाेलिस दलात सामान्य बदल्यांची यादी लवकरच जाहीर हाेणार आहे. एकाच ठिकाणी नियुक्ती, जिल्हा व परिक्षेत्रात कार्यकाळ पूर्ण झालेल्यांना हलविले जाणार आहे. परंतु, त्यातील पदाेन्नतीला पात्र असलेले पाेलिस अधिकारी मात्र अस्वस्थ आहेत. कारण त्यांची आता सामान्य बदल्यांमध्ये बदली हाेईल, मग पदाेन्नती निघेल व त्या पदाेन्नतीसाेबत पुन्हा त्यांना नव्या बदलीला सामाेरे जावे लागेल. या सर्व संभाव्य फेरबदलांमुळे पाल्याचे शिक्षण व एकूणच काैटुंबिक अडचणी वाढणार असल्याचा पाेलिस अधिकाऱ्यांमधील सूर आहे.
३१ मे ही पाेलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची डेडलाइन आहे. एखादवेळी त्याला महिनाभर मुदतवाढही दिली जाऊ शकते. बदल्यांच्या यादीकडे सर्वांच्या नजरा लागल्या असताना पदाेन्नती हा विषयही ऐरणीवर आला आहे. कारण पाेलिस उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक, निरीक्षक या सर्व श्रेणीतील बढत्या रखडल्या आहेत. पाेलिस निरीक्षकांना तर सर्वकाही ‘ओक्के’ असूनही गेल्या पाच महिन्यांपासून पदाेन्नतीच्या यादीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. सामान्य बदलीपूर्वी या अधिकाऱ्यांची पदाेन्नती यादी जारी न झाल्यास त्यांना किमान दाेनवेळा बदलीचा सामना करावा लागणार आहे. सामान्य यादीत (जीटी) बदलीस पात्र अधिकाऱ्याची बदली हाेईल. त्यानंतर पदाेन्नतीची यादी निघाल्यास त्या पाेलिस अधिकाऱ्याला पदाेन्नतीवर नव्या ठिकाणी नियुक्ती दिली जाईल. त्यामुळे त्याला आताच झालेल्या बदलीच्या ठिकाणावरून पदाेन्नतीने पुन्हा हलविले जाईल. तसे झाल्यास बदली, बढती व पुन्हा बदली याचा सामना त्या अधिकाऱ्याला करावा लागेल. त्यामुळे पाल्यांचे शाळा प्रवेश, किरायाचे घर, काैटुंबिक स्थलांतर या सर्वच बाबतीत या पाेलिस अधिकाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. राज्य सरकारचा एकूणच अस्थिर कारभार पाहता सामान्य बदल्या वेळेत हाेणार की नाही याबाबतच पाेलिस दलात साशंकतेचे वातावरण पाहायला मिळते.
मुदतवाढीसाठी अनेकांची फिल्डींग
अनेक पाेलिस अधिकाऱ्यांचा जिल्हा व परिक्षेत्रातील शासन निर्धारित कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्यांची बदली हाेणार हे निश्चित आहे. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांनी आहे त्या जिल्ह्यात, परिक्षेत्रात एक वर्ष मुदतवाढ मिळावी यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्याकरिता पाल्याचे शिक्षण, कुटुंबातील सदस्याचा आजार ही कारणे पुढे केली आहेत. काहींनी या मुदतवाढीसाठी आपल्या राजकीय व प्रशासकीय गाॅडफादरमार्फत थेट पाेलिस महासंचालक कार्यालयापर्यंत फिल्डींगही लावली आहे.
बदली-प्रमाेशन-बदली काहींच्या पथ्यावर
सामान्य बदली, नंतर हाेणारे प्रमाेशन व त्यासाठी पुन्हा हाेणारी बदली ही काही पाेलिस अधिकाऱ्यांना अगदी साेयीची आहे. अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकच जिल्हा, परिक्षेत्रात आहेत. आता बदलीवर जिल्हा किंवा परिक्षेत्राबाहेर जायचे व पदाेन्नती झाली की पुन्हा साेयीचा जिल्हा व परिक्षेत्रात बदलून यायचे असाही काहींचा अजेंडा आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी बदली व प्रमाेशनचा हा पॅटर्न डाेकेदुखी नव्हे तर साेयीचा ठरणार आहे. त्यादृष्टीने अनेकांनी लगतच्या परिक्षेत्रात जाऊन हात लावून परत येण्याचे नियाेजनही केले आहे.