नांदेड जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 06:24 PM2019-09-07T18:24:46+5:302019-09-07T18:28:31+5:30
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे झाल्या बदल्या
नांदेड : आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे झालेल्या बदल्यामध्ये जिल्ह्यातील तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची बदली झाली आहे़ त्यात बहुचर्चित संतोष वेणीकर यांना परभणी येथे विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे़ तर नांदेडचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून धर्माबादचे उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे़
नांदेड येथील रोहयो उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांची बदली हिंगोलीच्या रोहयो उपजिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे़ धान्य घोटाळ्यात फरार असलेले निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांच्या बदलीचे आदेशही ६ सप्टेंबर रोजी निघाले आहेत़ त्यांना परभणी येथे विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे़ जिल्ह्यात तहसीलदारांच्या बदल्याही झाल्या असून त्यात नांदेड, हदगाव आणि धर्माबाद तहसीलदारांचा समावेश आहे़
नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर यांची बदली बीड तहसीलदार म्हणून करण्यात आली आहे़ तर औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथील अरूण जरहाड हे अंबेकर यांच्या जागी नांदेडचे तहसीलदार म्हणून येणार आहेत़ हदगावच्या तहसीलदार वंदना निकुंभ यांचीही बदली झाली असून त्यांना परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक या रिक्त पदावर पाठवण्यात आले आहे़ धर्माबादच्या तहसीलदार ज्योती चव्हाण यांची बदली परभणी जिल्ह्यातील पालम येथे करण्यात आली आहे़ पालम येथील तहसीलदार संतोषी देवकुळे यांच्या रिक्त जागी त्या पदभार स्वीकारणार आहेत़