तीर्थक्षेत्राच्या निधीतून बारूळ महादेव मंदिराचा कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:34 AM2018-12-12T00:34:42+5:302018-12-12T00:38:23+5:30
बारूळसह परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान, जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या महादेव मंदिराचा तीर्थक्षेत्र, पर्यटन विकास, स्थानिक विकास या विविध निधीच्या माध्यमातून कायापालट झाला आहे़ परिसरातील एक भव्य-दिव्य व रम्य ठिकाण म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते़ विकासकामांमुळे भाविकांची संख्या वाढली आहे़
गोविंद शिंंदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
बारुळ: बारूळसह परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान, जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या महादेव मंदिराचा तीर्थक्षेत्र, पर्यटन विकास, स्थानिक विकास या विविध निधीच्या माध्यमातून कायापालट झाला आहे़ परिसरातील एक भव्य-दिव्य व रम्य ठिकाण म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते़ विकासकामांमुळे भाविकांची संख्या वाढली आहे़
बारूळ व परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान म्हणून बारूळचे मंदिर सर्वदूर परिचित आहे़ सदर मंदिरातील महादेव पिंड सिंहासनावर असून नवसाला पावणारे हे जागृत देवस्थान म्हणून भाविकांमध्ये ख्याती आहे़ अनेक जण या ठिकाणी नवस करून आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर तो फेडण्यासाठी येतात़ बहुतांश भाविकांकडून मंदिर विकासासाठी त्यांना जमेल तशा प्रकारची देणगी देतात़
या मंदिराचा लोकसहभागातून १ जानेवारी १९९८ रोजी जीर्णोद्धार करण्यात आला़ त्यास तीर्थक्षेत्र, पर्यटन विकास, स्थानिक विकास या विविध मार्गाने १ कोटी २० लाख रुपयांच्या निधीतून परिसराचा विकास करण्यात आला आहे़ यामध्ये मंदिर परिसरात मंगल कार्यालय, स्वयंपाक गृह, संरक्षक भिंत, बगीचा सुशोभिकरण, मंदिरातील फरशी, परिसरातील सीसी रस्ते, परिसरातील नालीचे बांधकाम, परिसरातील पाणीपुरवठा, पालखी मार्ग, सीसी रस्ते, कंपाऊंड वॉल, महिला-पुरुषांसाठी स्वच्छता, शौचालय गृह, मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे, वाहनासाठी पार्कीग व्यवस्था यासह विविध कामे करण्यात आली़ तर काही कामे अजूनही चालू असून या सर्व निधीमधून या मंदिर व गावाच्या वैभवात भर पडली आहे़
महादेव यात्रेनिमित्त येथे दरवर्षी राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येतात़ कुस्ती, क्रिकेट, व्हॉलिबॉल आदीसह सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येते़ हा सर्व खर्च भाविकांकडून उपलब्ध होणारी देणगी आणि मंदिराच्या पैशातून होते़ प्रशासनाकडून दरवर्षी यात्रेसाठी विशेष निधी मिळाला तर यात्रेला अजूनही चांगले स्वरुप येईल़ तसेच ग्रामीण भागातील विविध कला, संस्कृती संवर्धनासाठी मदत होईल़ महादेव मंदिर परिसरात भरणाऱ्या यात्रेला एक परंपरा असून ती जपण्यासाठी बारूळसह परिसरातील नागरिकांकडून प्रयत्न केले जातात़ परंतु, यात्रेत येणाºया भाविक, यात्रेकरूंना सोईसुविधा मिळत नसल्याने यात्रेकरूंची संख्या दिवसेंदिवस घटत आहे़ त्यामुळे येथे सुविधा पुरविण्यासाठी यात्रेस निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे़
बारूळ येथील जागृत देवस्थान महादेव मंदिराच्या वैभवात वाढ करण्यासाठी आ़ प्रतापराव पा़ चिखलीकर, माजी आ़ शंकरअण्णा धोंडगे, माजी आ़ रोहिदास चव्हाण, माजी खा़भास्करराव पा़ खतगावकर, जि़प़ सदस्य संगीता धोंडगे, जि़प़ सदस्य अॅड़ विजय पा़ धोंडगे यांनी तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळ, स्थानिक विकास या विविध निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला़ त्यामुळेच मंदिर व गावाच्या वैभवात भर भडली आहे़
यात्रेस निधी उपलब्ध करून द्या
बारूळ येथील जागृत देवस्थान परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान महादेव मंदिर असून या मंदिराचा सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी विविध मार्गातून, निधीतून या मंदिराचा व परिसराचा कायापालट केला आहे़ या देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला असून यात्रेनिमित्त या मंदिराला निधी दिला तर यात्रेचे स्वरूप बदलण्यास मदत होईल़
-सदाशिव नाईक, महादेव मंदिर समिती अध्यक्षअंदाजपत्रकाचे काम सुरू
बारूळ येथील महादेव मंदिराचा पर्यटनस्थळ, स्थानिक विकासासह विविध निधीतून कायापालट झाला़ जिल्हाधिकारी यांच्याकडून या मंदिराच्या सोयीसुविधासह आदी कामांसाठी अंदाजपत्रक करण्याचे आदेश मिळाले असून मंदिर संस्थान समिती व गावकºयांच्या सूचनेनुसार लवकरच अंदाजपत्रक तयार करण्यात येईल
-बालाजी पवार, कनिष्ठ अभियंता, सा़बां. विभाग, कंधाऱ