धनगरांसोबत विश्वासघातकी राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:25 AM2019-01-07T00:25:19+5:302019-01-07T00:27:02+5:30

आतापर्यंत महाराष्ट्रातील धनगर समाजाने ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच धनगर समाजाचा विश्वासघात केला. कारण, ज्या शिडीवर पाय ठेवून आमदार, खासदार वर गेले त्यांनी आपले घर सावलीत बांधून तुमचे घर उन्हात बांधले.

Treacherous politics with Dhangars | धनगरांसोबत विश्वासघातकी राजकारण

धनगरांसोबत विश्वासघातकी राजकारण

googlenewsNext
ठळक मुद्देपंकजा मुंडे यांचा आरोप धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मंत्रालयात पाय ठेवणार नाही

लोहा : आतापर्यंत महाराष्ट्रातील धनगर समाजाने ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच धनगर समाजाचा विश्वासघात केला. कारण, ज्या शिडीवर पाय ठेवून आमदार, खासदार वर गेले त्यांनी आपले घर सावलीत बांधून तुमचे घर उन्हात बांधले. तुमच्यामुळेच २०१४ ला राज्य व केंद्रात सत्तापरिवर्तन झाले. त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मंत्रालयात प्रवेश करणार नसल्याची घोषणा राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केली.
लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रेतील कुस्ती मैदानालगत धनगर आरक्षण जागर महामेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ना. पंकजा मुंडे बोलत होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आयोजक गणेश हाके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, खा. विकास महात्मे, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आ. गोविंद केंद्रे, देवीदास राठोड, अ‍ॅड. मुक्तेश्वर धोंडगे, विठ्ठल रबदाडे, कल्याणी वाघमोडे, निहारिका खोलगे, जि. प. सदस्य दशरथ लोहबंदे, सरपंच गोविंदराव राठोड, माजी जि. प. सदस्य भगवान हाके यांची उपस्थिती होती.
प्रारंभी पंकजा मुंडे यांनी हेलिकॉप्टरने पूर्ण माळेगाव यात्रेवर फेरी मारली व खंडेरायाचे दर्शन घेऊन सभास्थळी दाखल झाल्या. उपस्थितांनी अहिल्यादेवी होळकर व कै. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने काठी आणि घोंगडी देऊन त्यांचा सत्कार केला़
यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, राज्यातील, देशातील विकास व सामान्य माणसांच्या हितासाठी केलेल्या कामाच्या जोरावर भाजपा पुन्हा सत्ता पादाक्रांत करणार आहे. धनगर आरक्षणाकडे वाकड्या नजरेने पाहिले तर काठी उगारल्याशिवाय राहणार नाही. धनगर समाजाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना आरक्षणाची गरज असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अहिल्यादेवीच्या आदर्शाने राज्यात जलयुक्त शिवार योजना राबविली.
अहिल्यादेवींनी बांधलेले घाट, विहिरी, बंधारे आजही शाबूत आहेत. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात झालेली कामे कागदोपत्रीच झाली. विकास कागदावरच झाला. त्यांनी स्वत:ची खळगी भरण्याचे काम केले. म्हणून राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. काँग्रेस- राष्ट्रवादीकडे सत्तर वर्षे सत्ता होती़ शेतकऱ्यांना दिलासा का नाही मिळाला. त्यामुळे त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. सत्ता परिवर्तन न करता भाजपाला पुनश्च सत्तेत पाठवा. मला सत्तेची लालसा नाही वंचितासाठी मी राजकारणात आहे. मला जातीपातीचे राजकारण आवडत नाही. आरक्षणासाठी मी तुमच्या संघर्षात सोबत आहे. वेळ पडली तर मी आंदोलनात सहभागी होईल.
धनगर समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी ५० कोटी खर्चून योजना आणली, पोहरादेवीच्या विकासासाठी २५ कोटी रूपयांचा निधी दिला. भक्तिस्थळापासून शक्तिस्थळापर्यंत कामे केली. राष्ट्रवादीचा आरक्षणाचा डाव फेल गेला़ पुढे राष्ट्रवादीच्या सभेच्या खुर्च्या रिकाम्या आहेत.
धनगर समाजबांधवांनो तुम्हाला शक्तिप्रदर्शन, आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. गरज पडल्यास मी आंदोलनात सहभागी असेल़ असेही त्या म्हणाल्या़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प.सदस्य चंद्रसेन पा. गौडगावकर यांनी तर व्यंकट मोकले यांनी आभार मानले.
अमित शहा आज नांदेडात
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे रविवारी नांदेड विमानतळावरुन हेलिकॉप्टरने लातूरला गेले़ रविवारी शहा यांनी तीन जिल्ह्यांतील भाजपा पदाधिका-यांची बैठक घेवून आढावा घेतला़ त्यानंतर रात्री शहा हे लातूरलाच मुक्काम करणार आहेत़ त्यानंतर सोमवारी सकाळी ते हेलिकॉप्टरने नांदेडला येणार आहेत़ सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी त्यांचे नांदेडात आगमन होणार आहे़ त्यानंतर ते सचखंड गुरुद्वारा दर्शनासाठी रवाना होणार आहेत़ गुरुद्वारा दर्शनानंतर ते काही वेळ शहरात थांबणार आहेत़ त्यानंतर ११ वाजता नांदेड विमानतळावरुन ते दिल्लीकडे रवाना होतील़

Web Title: Treacherous politics with Dhangars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.