देशभर फडकतोय नांदेडचा तिरंगा ध्वज; १५ ऑगस्टसाठी १८ हजार राष्ट्रध्वज तयार केले जाणार
By भारत दाढेल | Published: July 22, 2022 07:37 PM2022-07-22T19:37:49+5:302022-07-22T19:39:13+5:30
संपूर्ण देशात नांदेड आणि कर्नाटक राज्यातील हुबळी या दोनच ठिकाणी राष्ट्रध्वज निर्माण केले जातात.
- भारत दाढेल
नांदेड : यंदा १५ ऑगस्टसाठी देशातील १६ राज्यांत लागणारे राष्ट्रध्वज तयार करण्याचे काम नांदेडच्या मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती केंद्रात अंतिम टप्प्यात आले असून, वेगवेगळ्या आकाराचे १८ हजार राष्ट्रध्वज तयार केले जात आहेत.
संपूर्ण देशात नांदेड आणि कर्नाटक राज्यातील हुबळी या दोनच ठिकाणी राष्ट्रध्वज निर्माण केले जातात. मराठवाडा खादी ग्रामोद्योेग समितीच्या नांदेड केंद्रात तयार होणारा तिरंगा ध्वज हा देशभर फडकतो. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकणारा राष्ट्रध्वजसुद्धा नांदेड येथेच तयार केला जातो. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीला मागील वर्षी ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. कोरोनामुळे दोन वर्षे उत्पन्नात घट झाली होती; परंतु लॉकडाऊनच्या काळातही राष्ट्रध्वज तयार करण्याची प्रक्रिया सुरूच होती. गतवर्षी मंत्रालयावर तर दोन वर्षांपूर्वी लाल किल्ल्यावर फडकणारा राष्ट्रध्वज नांदेडला तयार झाला होता. यावर्षी २ बाय ३ फुटांचे १० हजार, ३ बाय साडेचार फुटांचे ५ हजार व ४ बाय ६ फुटांचे ३ हजार राष्ट्रध्वज तयार केले जात आहेत.
मागील २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त १५ हजार राष्ट्रध्वज तयार केले होते. त्यातून १ कोटी २४ लाख रुपयांचे उत्पन्न झाले होते. सध्या शिवणकामासाठी ६ कामगार परिश्रम घेत आहेत. जिल्ह्यात आजादी का अमृत महोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी नुकतीच बैठक घेऊन प्रत्येक शासकीय कार्यालय व इतर ठिकाणी तिरंगा ध्वज फडकविण्यासाठी नियोजन केले आहे. यासाठी लागणाऱ्या ध्वजांचा पुरवठा खादी ग्रामोद्योग समिती केंद्राकडून केला जाणार आहे. दीड बाय सव्वा दोन फूट आकाराचे १० हजार ध्वज राखीव ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती व्यवस्थापक मठपती यांनी दिली.
केंद्राला शासनाच्या मदतीची गरज
१९६७ मध्ये मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीची स्थापना झाली. त्यानंतर १९९२ पासून राष्ट्रध्वज निर्मितीचे काम सुरू झाले. कोरोनामुळे मागील दोन-तीन वर्षे केंद्राचे उत्पन्न घटले होते. ते भरून काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. केंद्राला शासनाच्या मदतीची गरज असून, खेळत्या भांडवलासाठी आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे.
- महाबळेश्वर मठपती, व्यवस्थापक, मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती, नांदेड.