प्रचाराचे रणशिंग फुंकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:13 AM2021-06-19T04:13:19+5:302021-06-19T04:13:19+5:30
नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलाेली विधानसभा मतदार संघात लवकरच पाेटनिवडणूक हाेणार आहे. त्याची अधिकृत घाेषणा निवडणूक विभागाने केलेली नसली, तरी ...
नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलाेली विधानसभा मतदार संघात लवकरच पाेटनिवडणूक हाेणार आहे. त्याची अधिकृत घाेषणा निवडणूक विभागाने केलेली नसली, तरी निवडणूक लढवू इच्छिणारे मात्र कामी लागले आहेत. काहींनी भेटीगाठीतून अप्रत्यक्ष प्रचारही सुरू केला आहे. गेल्या आठवड्यात काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशाेकराव चव्हाण यांनीही याच मतदार संघात माेठ्या प्रमाणात विकास कामांचे लाेकार्पण व भूमिपूजन केले. या माध्यमातून ना.चव्हाण यांनी पाेटनिवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल फुंकल्याचे मानले जाते. या कार्यक्रमात इच्छुकांनी स्वत:वर फाेकस निर्माण करून घेण्याची काेणतीही संधी साेडली नाही. अगदी अशाेकरावांच्या खाद्याला खांद्या लावून ते उभे हाेते. पाेटनिवडणुकीतून आमदार हाेण्यासाठी काॅंग्रेसमध्ये अनेक चेहरे इच्छुक आहेत. मात्र, उमेदवारीची माळ दिवंगत रावसाहेब अंतापूरकरांच्या वारसांच्या गळ्यात पडेल की, ऐन वेळी अन्य कुणाच्या गळ्यात पडेल, याचे पत्ते अशाेकरावांनी अद्याप उघडलेले नाहीत. सध्या तरी ‘काॅंग्रेसच्या उमेदवाराला विजयी करा,’ एवढेच ते सांगत असून, उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे बाेट दाखविले जात आहे. यावरून इच्छुक उमेदवारांची गर्दी व उमेदवारी जाहीर करताना स्थानिक काॅंग्रेस नेतृत्वाची लागणारी कसाेटी लक्षात येते. एका दाेघांनी तर यावेळी संधी साेडायची नाही, असे म्हणून वेळ प्रसंगी बंडाचे निशाण फडकविण्याचीही तयारी केल्याची चर्चा राजकीय गाेटात आहे.