जीवंत जाळण्याचा प्रयत्न: तिघांना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:53 AM2018-04-27T00:53:25+5:302018-04-27T00:53:25+5:30
शेतीच्या वादातून सख्ख्या भावाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी तिघांना जन्मठेपेची शिक्षा जिल्हा न्यायाधीश दुसरे श्रीमती एम़ व्ही़ देशपांडे यांनी सुनावली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शेतीच्या वादातून सख्ख्या भावाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी तिघांना जन्मठेपेची शिक्षा जिल्हा न्यायाधीश दुसरे श्रीमती एम़ व्ही़ देशपांडे यांनी सुनावली आहे़
मुदखेड तालुक्यातील दरेगाव येथील बाबाराव सखाराम एडके व मधुकर सखाराम एडके या भावामध्ये गट नंबर २९३ मधील ३ एकर ४ आर शेत जमीनीवरुन वाद होता़ बाबाराव हा नांदेडमध्ये सायकल रिक्षा चालवून उदरनिर्वाह करीत असे़ बाबारावने या शेतात हायब्रीड ज्वारी लावली होती़ ५ नोव्हेंबर २०११ रोजी सकाळी साडे अकरा वाजता बाबाराव नांदेडहून शेतातील कणसे कापण्यासाठी टेम्पोतून मजूर घेऊन गेला होता़ त्यात कुसुमबाई सोनसळे, संगीता जोंधळे, अरुणाबाई पाईकराव, नीलाबाई जोंधळे व इतर चार जणांचा समावेश होता़ हे सर्व जण तेथे पोहोचल्यावर बाबारावचा सख्खा भाऊ मधुकर, त्याची बायको शोभाबाई, ओम मधुकर, माधव सखाराम व अन्य काही जण कत्ती व रॉकेल घेऊन आले आणि त्यांनी वाद घातला़ या शेतात आमचा हिस्सा आहे़ टेम्पो परत घेऊन जा, नाही तर टेम्पो जाळून टाकतो अशी धमकी दिली़ यावेळी मधुकर, माधव, ओम यांनी कत्तीने हल्ला करुन बाबारावला गंभीर जखमी केले़ तसेच शोभाबाईने बाबारावच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले़ तो जळत असताना मजूर महिलांनी माती टाकून आग विझविली़ या मजूर महिलांनीच नांदेडला त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवले, असा जबाब बाबारावने मुदखेड पोलिसांकडे दिला होता़ या घटनेत बाबाराव ५३ टक्के भाजला होता़ त्याच्या जबाबावरुन मुदखेड पोलिसांनी सहा जणांविरुध्द भादंवि ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करुन पोलीस निरीक्षक पी़. एन. खेडकर यांनी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़
जिल्हा न्यायाधीश दुसरे श्रीमती एम . व्ही. देशपांडे यांच्यासमोर दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाला़ शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील डी. जी. शिंदे यांनी काम पाहिले़ त्यांनी प्रत्यक्षदर्शींंचा जबाब व सबळ पुराव्या आधारे मधुकर, शोभाबाई व माधव यांना दोषी ठरवून जन्मठेप व प्रत्येकी ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली़