हिंगोलीगेट जवळ वृद्धाला लुबाडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 01:01 AM2019-06-30T01:01:19+5:302019-06-30T01:01:41+5:30
उपचारासाठी मुखेड तालुक्यातील बेळी येथून नांदेडमध्ये आलेल्या एका वृद्धाला लुबाडण्याचा प्रयत्न सायंकाळी शहरातील हिंगोली गेट भागात घडला. प्रारंभी या वृद्धाने आपल्याजवळील १ लाख रुपये हिसकावल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर त्या वृद्धाकडे साठ हजार रुपये आढळले.
नांदेड : उपचारासाठी मुखेड तालुक्यातील बेळी येथून नांदेडमध्ये आलेल्या एका वृद्धाला लुबाडण्याचा प्रयत्न सायंकाळी शहरातील हिंगोली गेट भागात घडला. प्रारंभी या वृद्धाने आपल्याजवळील १ लाख रुपये हिसकावल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर त्या वृद्धाकडे साठ हजार रुपये आढळले. त्यानंतर नातेवाईकांनी रक्कम गेली नसल्याचे सांगत या प्रकरणावर पडदा टाकला.
पैलवाड यांनी सांगितल्याप्रमाणे बेळी येथून बाबू दामाजी पैलवाड हे आपल्या पायाच्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी तसेच आॅपरेशनसाठी नांदेडमध्ये आले होते. हिंगोली येथे उतरुन ते आपल्या भावाकडे हनुमानगड येथे पायी जात होते. यावेळी आॅटोतून आलेल्या तिघांनी त्यांना बळजबरीने आॅटोत बसविले. पाठीमागील दोघांनी त्यांच्या पिशवीतील एक लाख रुपये हिसकावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आरडाओरड केली. यावेळी आॅटोचालकांसह तिघांनीही तेथून पोबारा केला. पोलिसांनी हा आॅटो शिवाजीनगर ठाण्यात लावला.
पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करत पैलवाड यांच्या नातेवाईकांना बोलाविले. त्यावेळी पैलवाड यांच्याकडे ६० हजार रुपये असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. साठ हजार रुपये त्यांच्याकडे सापडलेही. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता. एकूणच गोकुळनगर रस्त्यावर घडलेल्या या प्रकाराबाबत साशंकता कायम आहे.
जबरी चोरीचा प्रकार
दुखापतीमुळे पैलवाड हे पोलीस ठाण्यातून निघून गेले. तसेच नातेवाईकही गेले. याप्रकरणी पोलीस सखोल चौकशी करीत असल्याचे शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फसके यांनी सांगितले. नातेवाईकांची तक्रार घेऊन या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला जाईल, असेही फसके म्हणाले.