तुंगार आंतरजातीय विवाह चळवळीचे अध्वर्यू होते -नयनकुमार आचार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:11 AM2021-02-19T04:11:38+5:302021-02-19T04:11:38+5:30
देवदत्त तुंगार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथील पीपल्स कॉलेजच्या नरहर कुरुंदकर सभागृहात बुधवारी सभा पार पडली. त्यावेळी नयनकुमार बोलत होते. ...
देवदत्त तुंगार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथील पीपल्स कॉलेजच्या नरहर कुरुंदकर सभागृहात बुधवारी सभा पार पडली. त्यावेळी नयनकुमार बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. हंसराज वैद्य, तर व्यासपीठावर शारदा तुंगार, माजी खा. डॉ. व्यंकटेश काब्दे, इंजि. द.मा. रेड्डी उपस्थित होते.
नयनकुमार आचार्य म्हणाले, हे जग परिवर्तनीय आहे. त्यामुळे जगात येणारा प्रत्येक जण जाणार हे निश्चित आहे; परंतु जीवन जगताना कसे जगावे, याचा आदर्श प्राचार्य देवदत्त तुंगार यांनी आचरणातून घालून दिला आहे. त्यांच्या निधनाने आर्य समाज चळवळीबरोबरच इतर क्षेत्राचीही मोठी हानी झाली आहे. तुंगार यांनी स्वत: आंतरजातीय विवाह केला आणि नंतर अनेकांचे आंतरजातीय विवाह आर्य पद्धतीने लावून दिले. ते कर्ते समाजसेवक होते. माजी खा. डॉ. व्यंकटेश काब्दे म्हणाले, आर्य समाज विचारसरणी देशासाठी सांस्कृतिक ठेवा आहे हे त्यांचे विचार मलाही पटले होते. कोणत्याही विचाराच्या विधायक चळवळीत त्यांचे योगदान असे.
यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नाम फाउंडेशन, बाभळी बंधारा कृती समिती, पीपल्स कॉलेज, भाकप आदींच्या वतीनेही तुंगार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.