सुशिक्षित बेकार युवकाने माळरानावर पिकविली हळद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:30 PM2018-12-07T12:30:08+5:302018-12-07T12:31:39+5:30

यशकथा : गोविंदराव गायकवाड यांनी माळरान, उंच ठिकाणी असलेल्या शेतीला वहितीखाली आणण्याचा निर्धार केला.

turmeric produced by the youth on the useless land | सुशिक्षित बेकार युवकाने माळरानावर पिकविली हळद

सुशिक्षित बेकार युवकाने माळरानावर पिकविली हळद

Next

- डॉ. गंगाधर तोगरे, (कंधार, जि. नांदेड)

कळका, ता. कंधार येथील सुशिक्षित बेकार युवकाने सव्वाचार एकर माळरान जमिनीवर हळद लागवड केली आहे. डोंगराळ शेती हिरव्या शालूने नटली असून, पिवळे सोने शिवारभर बहरले असून सात लाख उत्पन्न काढण्यासाठी गोविंदराव संग्राम गायकवाड यांनी संकल्प केला आहे.

कंधार तालुका बालाघाट डोंगराच्या पर्वतरागांनी व्यापला आहे. गाव तेथे टेकडीने नैसर्गिक सौंदर्यात भर पडली आहे; परंतु शेती, पाणी, रस्ता या समस्यांचा सामना करीत विकासाचे टप्पे गाठणे कठीण जाते. कळका गाव याला अपवाद नाही. गोविंदराव गायकवाड यांनी माळरान, उंच ठिकाणी असलेल्या शेतीला वहितीखाली आणण्याचा निर्धार केला. सव्वाचार एकर जमिनीवरील दगड काढणे कठीण व खर्चिक होते. भाऊ डॉ़ ज्ञानेश्वर गायकवाड यांनी आर्थिक सहकार्य, मार्गदर्शन केले. त्यामुळे उत्साह वाढला. यानंतर ते कामाला लागले.

शेतातील दगड, गोटे काढणे म्हणावे तेवढे सोपे काम नव्हते. एवढ्या मोठ्या शेतातील दगड-गोटे काढण्यासाठी बराच खर्च येणार होता. मात्र, गायकवाड यांचा निर्धार पक्का होता. भावाने केलेल्या आर्थिक सहकार्यामुळे गोविंदराव यांनी ५० ट्रॅक्टर, दगड-गोटे शेतीतून काढले. यानंतर मशागत करून जमीन लागवडयोग्य केली. दुसरी समस्या होती पाण्याची. तेथे पाण्याची सोय नसल्याने त्यांनी तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बारूळ धरणातून पाईपलाईन टाकून पाणी शेतावर आणले. यानंतर त्यांनी या शेतात हळद लागवडीचा निश्चय केला. हळद लागवडीबाबत सर्व माहिती जाणून घेतली. यानंतर त्यांनी सेलम जातीच्या बेण्याची निवड करून लागवड केली.

रासायनिक व सेंद्रिय खताचा वापर केला. परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील डॉ. आपेट यांच्या मार्गदर्शनखाली रोगनियंत्रण, पोषण, मशागत करण्यात येऊ लागली. जून महिन्यात लागवड केलेली हळद ५ फुटांची उंच झाली. कंदवाढीसाठी जीव अमृतचा वापर फलद्रूप झाला. गोविंदराव यांना पत्नी अल्का गायकवाड, गुणाजी गायकवाड यांची मशागतीला साथ मिळाली.
एकूण लागवडीचा खर्च दीड लाख झाला आहे. वाफा पद्धतीने ठिबक पाणी खर्च सत्तर हजार झाला.

आता हळद पिकाने शिवार फुलले आहे. प्रतिक्विंटल भाव ६ ते ७ हजार आहे. एकरी ३० ते ३५ क्विंटल हळद उतारा निघेल. बेणे ठेवून विक्रीसाठी हळद १०० क्विंटल येईल. सात लाखांचे उत्पन्न निघेल. एवढी मेहनत युवकाने केली आहे. तीन महिन्यांनंतर हळद काढणी होईल. त्यावेळी शेती किफायतशीर राहते. हे सिद्ध करण्यासाठी हा युवक मशागत करीत आहे. माळरानावर शेती फुलवून मन्याड खोऱ्यात नवा अध्याय रचन्यासाठी परिश्रम घेताना कोणतीच कसर तो सोडत नाही. शेती हिरवी करून उत्पन्न काढणे सोपे नाही. ही जाणीव असताना सहजपणे न घेता श्रम, जिद्द, संयम, आत्मविश्वास, सहकार्य आदींच्या बळावर गायकवाड यांनी आव्हान तडीला नेले. असा माळरानावरील शेतीचा प्रयोग कुतूहलाचा विषय ठरला आहे.

Web Title: turmeric produced by the youth on the useless land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.