हळदीला आली सोन्याची झळाळी; पंधरा हजारांचा मिळाला दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:17 AM2021-03-07T04:17:10+5:302021-03-07T04:17:10+5:30
हळद हे पीक प्रामुख्याने सौंदर्य प्रसाधने आणि औषधी निर्मितीसाठी उपयुक्त असणारे नगदी पीक आहे. हळद हे उसाला पर्यायी पीक ...
हळद हे पीक प्रामुख्याने सौंदर्य प्रसाधने आणि औषधी निर्मितीसाठी उपयुक्त असणारे नगदी पीक आहे. हळद हे उसाला पर्यायी पीक असून हळदीचे पीक उसापेक्षा कमी पाण्यावर येणारे पीक आहे. त्यामुळे शेतकरी हळदीची लागवड करत आहेत. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने हे पीक घेतले जात आहे. हळदीच्या लागवडीपासून काढणीपर्यंत साधारणपणे १० ते ११ महिन्यांचा कालावधी या पिकासाठी लागतो. सामान्यपणे लागवड ते काढणीपर्यंतचा सरासरी एकरी खर्च ५० ते ६० हजारापर्यंत येतो. या वर्षी अतिपाऊस झाल्यामुळे हळदीचे उत्पादन प्रचंड घटले असून उतारा कमी निघत आहे. एकरी साधारणपणे ३० क्विंटल असणारे उत्पन्न २० क्विंटलपर्यंत आले आहे. ज्या कोरोनामुळे शेतीला वाईट दिवस आले. तोच कोरोना हळदीच्या बाबतीत मात्र सध्या सकारात्मक चित्र दाखवत आहे. पाश्चिमात्य देशात कोरोनाची परिस्थिती अजूनही म्हणावी तितकी आटोक्यात नाही. हळद हे रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे पीक आहे. त्यामुळे विदेशातही मागणी वाढत आहे. निर्यातही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे देशातील उत्पादनही घटणार आहे. त्यातच देशातील मागणी वाढली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मोठी मागणी राहणार असल्यामुळे हळदीचे दर टिकून राहतील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊनच्या काळात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना हळदीला सध्या सोन्याची झळाळी मिळत असल्याचे दिसून येत आहे. सध्या प्रतिक्विंटल साडेचार ते पाच हजारांवर झालेल्या दराने आठवडाभरात आठ ते अकरा हजारांपर्यंत मजल मारत आठ वर्षांतील उच्चांक मोडला आहे.