ई-पासची यंत्रणा बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:19 AM2021-05-21T04:19:11+5:302021-05-21T04:19:11+5:30

घरकुलाला पडल्या भेगा बरबडा : नायगाव तालुक्यातील बरबडा येथील २४८ लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने साडेपाच कोटी रुपये मंजूर केले. ...

Turn off the e-pass system | ई-पासची यंत्रणा बंद करा

ई-पासची यंत्रणा बंद करा

Next

घरकुलाला पडल्या भेगा

बरबडा : नायगाव तालुक्यातील बरबडा येथील २४८ लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने साडेपाच कोटी रुपये मंजूर केले. परंतु घरकुलाचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे घरकुलाला भेगा पडल्या आहेत. तसेच ड्रेनेज पाईपलाईनही वापराआधीच फुटली आहे. पावसाळ्यात अनेक घरांत पाणी शिरत असल्याची तक्रार याठिकाणी राहणाऱ्या लोकांनी केली आहे.

नाले सफाईला सुरुवात

धर्माबाद : तालुक्यातील पिंपळगाव येथे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांच्या पुढाकारातून तसेच गावातील नवयुवकांनी गाव स्वच्छतेच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. पावसाळ्यापूर्वी नाले सफाई करण्यात येत असून, विद्युत दिव्यांची व्यवस्था सुद्धा करण्यात येत आहे. सरपंच मोहन भंडरवार, उपसरपंच प्रतिनिधी गंगाधर दुड्डे, ग्रामसेवक रवी सरोदे, आदी उपस्थित होते.

भजनी मंडळी कलावंतांना आर्थिक मदत द्या

अर्धापूर : कोरोना काळात भजनी मंडळी कलावंतांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी कलावंतांकडून करण्यात आली आहे. कोरोना काळात कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने कामगार, मजूर यांना मासिक वेतन लागू केले आहे. परंतु, भजनी मंडळ, कीर्तनकार यांना अद्याप कोणतीच मदत करण्यात आली नाही.

वानराला जीवदान

लोहा : पार्डी शिवारातील शेतात विहिरीत पडलेल्या वानराला वनविभागाने प्रयत्न करून बाहेर काढले. पाण्याच्या शोधात आलेले वानर विहिरीत पडले होते. त्याला बाहेर पडता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी वनविभागाला कळविले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वानराला बाहेर काढून त्याला जीवदान दिले.

पाण्यासाठी भटकंती

हदगाव : पळशी परिसरातील अनेक गावांत पाण्याचे स्रोत आटल्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. गावातील विहिरी, विंधन विहिरीची पाणी पातळी खालावली असून, अनेक ठिकाणचे हातपंप बंद पडले आहेत.

कंधार बसस्थानकात शुकशुकाट

कंधार : संचारबंदीमुळे जिल्ह्यात मोजक्याच बस सुरू असून, त्यामुळे कंधार येथील बसस्थानकात दिवसभरात ठराविक बसगाड्या येत आहेत. त्यामुळे या ठिकाणी शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. मागील महिनाभरापासून कंधार बसस्थानकात हेच चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

विंधन विहिरीची पाणीपातळी घटली

मुदखेड : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. कडक उन्हामुळे विहिरी व विंधन विहिरीच्या पाणीपातळीवर परिणाम झाला असून, पाणीपातळी घटत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसपिकाला पाणी द्यायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Turn off the e-pass system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.