बाराशे केळीत बाराशे मिरची रोपे; तिखट मिरचीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 06:41 PM2020-11-13T18:41:55+5:302020-11-13T18:44:04+5:30
केळी पाच बाय पाच अंतरावर लावली जाते. पाच बाय पाचमधील रिकाम्या क्षेत्रात राहिलेल्या मिरचीची लागवड केली आहे.
- युनूस नदाफ
पार्डी : अर्धापूर तालुका हा केळीचा पट्टा म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रात बहुतांश शेतकरी दोन्ही हंगामात केळीचे पीक घेतात. केळी पूरकव्यवसाय म्हणून लागवड केली जाते. यातून आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न केला जातो. सध्या बाजारात पालेभाज्याचे दर आकाशाला भिडले आहेत. बाजारात मिरचीला ५० ते ६० रुपये किलो दराने मागणी केली जात आहे. हेच लक्षात घेऊन अर्धापूर तालुक्यातील देळूब ( बु.) येथील युवा शेतकरी शैलेश लोमटे यांनी एक एकर क्षेत्रात केळीची लागवड केली आहे. केळी पाच बाय पाच अंतरावर लावली जाते. पाच बाय पाचमधील रिकाम्या क्षेत्रात राहिलेल्या मिरचीची लागवड केली आहे. या शेतकऱ्यास केळीचे उत्पन्न मिळणारच आहे, पण मिरचीचे उत्पन्न मिळवण्यास सुरुवात झाली आहे. या मिरचीपासून उत्पन्न मिळवित इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
गतवर्षापासून पिकांवर अस्मानी संकटाचा मारा बसत आहे. परिणामी त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यावर पर्यायी व पूरक व्यवसाय म्हणून मिरचीची लागवड केली आहे. युवा शेतकरी शैलेश लोमटे यांनी जून महिन्यात बाराशे केळीची लागवड केली. केळी पाच बाय पाच या अंतरावर केली असून पाच बाय पाच ही रिकामी राहिलेल्या क्षेत्रात मिरचीची लागवड केली आहे. एक एकरात बाराशे रोपांची लागवड केली. मिरचीची लागवड करून तीन महिन्यांच्या कालावधीतच मिरची तोडण्यास सुरुवात झाली आहे. दररोज वीस ते पंचवीस किलो तोडली जात आहे. सध्या बाजारात मिरचीला मागणी असल्याने मिरचीला ५० ते ६० रुपये किलो दर मिळत आहे. मिरचीचे दररोज एक हजार ते पंधराशे रुपये प्रतिदिन उत्पन्न काढले जात आहे.
आंतरपिकातील खतांच्या वापराबाबत नियोजन
दररोज शेतकऱ्याच्या हातात खेळता पैसा मिळत असल्याने तिखट मिरचीने शेतकऱ्याच्या जीवनात गोडवा आणला आहे. मिरची आणखी एक ते दोन महिने उत्पन्न देत राहील, असे शेतकऱ्याने सांगितले. नांदेड, अर्धापूर, वसमत, वारंगा आदी बाजारपेठ उपलब्ध आहेत. कमी खर्चात या बाजारपेठेत जाता येते. सकाळी लवकर उठून बाजारपेठेत जाऊन ठोक दरात विक्री करून परत येऊन शेतात राहिले. काम पूर्ण केले जाते विशेष म्हणजे, ठिबक सिंचन योजना तसेच आंतरपिकाबाबत व खतांच्या वापराबाबतही त्यांनी योग्य नियोजन केले.