बारा वर्षांनंतर बाळ झालं अन् डोळ्यादेखत गेलं... नांदेडमधील मृत्यू तांडव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 05:38 AM2023-10-06T05:38:08+5:302023-10-06T05:40:00+5:30
त्याचा जीव घेतला म्हणत बाळाच्या आईने हंबरडा फोडल्याने काळीज चर्रर्र झाले
श्रीनिवास भोसले
नांदेड : हातपाय वाकडे झाले... बाळाला झटके येत होते. बघा बघा म्हणून विनवण्या केल्या... तरी बघत नव्हते... या डॉक्टरांनी माझ्या बाळाचा जीव घेतला, म्हणत पैठणच्या एका मातेने हंबरडा फोडला. आक्रोश करणाऱ्या मातेला शांत व्हा, म्हणून धीर देणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना, ‘मी कसं शांत राहू... मला १२ वर्षांनंतर बाळ झालं हाेतं. त्याचाही जीव घेतला हो...’, असे म्हणत या मातेने टाहो फोडला. या महिलेच्या आक्रोशाने उपस्थितांचे मन हेलावले.
पैठण येथील एका महिलेची प्रसूती झाल्यानंतर तिच्या बाळाला नांदेडच्या शासकीय रुग्णालयाच्या नवजात बालक अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले. परंतु, गुरुवारी त्याचा झटके येऊन मृत्यू झाला. तब्बल बारा वर्षांनंतर जी स्त्री आई झाली, तिचे मातृत्व अवघ्या काही क्षणात हिरावल्याने होणाऱ्या वेदना तिलाच माहीत. मृत्यू सत्र कधी थांबणार, असा संतप्त सवाल केला जात आहे.
दिल्ली वाऱ्या झाल्या असतील तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नांदेडात येऊन मयत बालकांच्या आईचे दु:ख जाणून घ्यावे. एकप्रकारे सरकारने ही सर्वसामान्य मायबाप जनतेची केलेली हत्याच असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही दाखल करणार आहोत. या घटनेची जबाबदारी स्वीकारून आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
- सुुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस
‘मंत्री साहेब, कुठंय औषधी...?’
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी नांदेड शासकीय रुग्णालयाला भेट दिल्यानंतर मुबलक औषधसाठा असल्याचा दावा केला होता. परंतु, आजही खासगीतून गोळ्या-औषधे आणायला लावली जात आहेत.
प्रशासन आणि शासनाच्या खोट्या आश्वासनांमध्ये रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये वैर निर्माण होत आहे. एकीकडे प्रशासन आणि शासन औषधसाठा असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे रुग्णालयात औषधे नसल्याने डॉक्टर, नर्स ती चिठ्ठीवर लिहून देत आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण होऊन नातेवाइक डॉक्टर, नर्सच्या अंगावर धाऊन येत आहेत.
‘आम्ही टीव्हीत पाहिलं... औषधे आहेत... तुम्ही का देत नाही...’ असे म्हणत रुग्णांचे नातेवाईक डॉक्टर आणि नर्स यांच्यासोबत वाद घालत आहेत.
न्यायालयीन चौकशी करा, दहा लाख द्या
मुंबई : राज्यातील शासकीय रुग्णालयात जवळपास १०० लोकांचे नाहक मृत्यू झाले आहेत, त्यात नवजात बालकांचाही समावेश आहे. सरकारी अनास्था व वैद्यकीय असुविधांमुळे हे मृत्यू झाले असून सरकार त्याबाबत गंभीर दिसत नाही.
नांदेड, छत्रपती संभाजीनगर व नागपूरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांना सरकारने तातडीने १० लाख रुपयांची मदत द्यावी, तसेच राज्यपालांनी या संपूर्ण प्रकरणाची माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांना केली आहे.
काँग्रेस शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, माजी खासदार हुसेन दलवाई, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, माजी मंत्री अस्लम शेख, आमदार भाई जगताप, आमदार अमिन पटेल, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झिशान सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत, डॉ. राजू वाघमारे, संजय लाखे पाटील यांचा समावेश होता.