नांदेड महापौरपदासाठी दोन अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:14 AM2019-05-31T00:14:06+5:302019-05-31T00:15:33+5:30
नांदेडच्या महापौर पदासाठी दोन अर्ज आले असून काँग्रेसच्या दीक्षा कपिल धबाले आणि भाजपाच्या बेबीताई गुपिले यांनी अर्ज दाखल केले आहे़ उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता़ महापालिकेतील संख्याबळ पाहता दीक्षा धबाले यांची महापौरपदी निवड निश्चित आहे़
नांदेड : नांदेडच्यामहापौर पदासाठी दोन अर्ज आले असून काँग्रेसच्या दीक्षा कपिल धबाले आणि भाजपाच्या बेबीताई गुपिले यांनी अर्ज दाखल केले आहे़ उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता़ महापालिकेतील संख्याबळ पाहता दीक्षा धबाले यांची महापौरपदी निवड निश्चित आहे़
नांदेड महापालिकेच्या महापौर शीलाताई भवरे यांनी २२ मे रोजी राजीनामा दिला होता़ या रिक्त पदाची माहिती विभागीय आयुक्तांना दिल्यानंतर महापौर निवडीचा कार्यक्रम २८ मे रोजी घोषित करण्यात आला़ त्यानुसार १ जून रोजी महापौर निवडीसाठी विशेष सभा होईल़ ३० मे च्या दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती़ महापौर पदासाठी काँग्रेसच्या दीक्षा धबाले यांनी तर भाजपाकडून बेबीताई गुपिले यांनी अर्ज भरला आहे़
काँग्रेसच्या उमेदवार दिक्षा धबाले यांचा अर्ज भरताना विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर, माजी महापौर शिला भवरे, उपमहापौर विनय गिरडे, सभापती फारुख अली खान, सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, माजी महापौर अब्दुल सत्तार, बापुराव गजभारे, शमीम अब्दुला, श्रीनिवास जाधव, पूजा पवळे आदींची उपस्थिती होती.
महापालिकेत काँग्रेसचे ८१ पैकी ७४ नगरसेवक आहेत़ भाजपाचे ६, शिवसेना १ आणि अपक्ष १ असे संख्याबळ आहे़ या संख्याबळाच्या आधारे ही निवडणूक काँग्रेस एकतर्फी जिंकेल, असेच चित्र आहे़ १ जून रोजी महापौर निवडीसाठी सकाळी ११ वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.
नांदेडचे महापौर पद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे़ काँग्रेसने महापौर पदासाठी सव्वा वर्षाचा फार्म्युला निश्चित केला होता़ या फार्म्युलानुसार शीलाताई भवरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता़ त्यांना जवळपास १७ महिन्यांचा कार्यकाळ मिळाला़ आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि उर्वरित कालावधी पाहता नव्या महापौरांना केवळ १० महिने या पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे़