मातासाहेब गुरुद्वाराच्या सेवेदारास धमकावणारे दोघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 05:53 PM2020-08-06T17:53:24+5:302020-08-06T18:03:18+5:30
मुदखेड पोलिसांनी मुगट परिसरात नाकाबंदी करून किरपालसिंह आणि राजू हरजीत जाधव या दोघांना ताब्यात घेतले़
नांदेड : नांदेडपासून जवळ असलेल्या मुगट येथील श्री गुरुद्वारा मातासाहेबचे सेवेदार गुलाबसिंह पूर्णसिंह यांना धमकाविल्याच्या आरोपातून दोघांना अटक करण्यात आली आहे़ या आरोपींकडून बंदुकीसह जिवंत काडतूसे तसेच खंजर जप्त करण्यात आला आहे़ गुरुवारी सकाळी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली़
नांदेड शहरापासून जवळ असलेल्या मुगट येथील श्री गुरुद्वारा मातासाहेबचे सेवेदार गुलाबसिंह हे बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास श्री मातासाहेब गुरुद्वाराचे जत्थेदार संतबाबा तेजासिंहजी यांच्या बैठकीसमोरील प्रांगणात उभे असताना एका दुचाकीवरून (क्ऱएम़एच़२६-ए़यु़९५२१) दोन युवक आले़ या युवकांनी सेवेदार गुलाबसिंह यांच्याकडे बाबा तेजासिंह यांच्या संदर्भात विचारपूस केली़ तसेच त्यांना बोलवा असे सांगत पिस्तुल काढून धमकावले़ दोन्ही युवकांचा हा सर्व संशयास्पद प्रकार पाहून गुलाबसिंह यांनी याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली़ पोलिसांचे नाव ऐकताच हे दोन्ही युवक घटनास्थळावरून पसार झाले.
या दरम्यान, मुदखेड पोलिसांनी मुगट परिसरात नाकाबंदी करून किरपालसिंह आणि राजू हरजीत जाधव या दोघांना ताब्यात घेतले़ या आरोपींकडून पोलिसांनी एका बंदुकीसह जिवंत काडतूसे आणि खंजरही जप्त केला़ या प्रकरणी दोन्ही युवकाविरूद्ध मुदखेड पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट कलम ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अर्धापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब देशमुख, भोकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी एनक़े़राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली़
तेजासिंह यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी
घटनेची माहिती समजल्यानंतर नांदेड येथील गुरुद्वारा लंगरसाहबचे संतबाबा बलविंदरसिंहजी यांनी आपल्या सहकाºयांसह मुगट येथील गुरुद्वारास भेट देऊन अकाली बुढादलचे जत्थेदार संतबाबा तेजासिंहजी यांच्याशी चर्चा केली़ दरम्यान गुरुद्वारा मातासाहेब देवांजी गुरुद्वारा, मुगटमधील सेवादार आणि जत्थेदार तेजासिंहजी यांच्या जिवास धोका असल्याने त्यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणी शीख समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे.