दोन सख्या भावांचा एकाच दिवशी कोरोनामुळे मृत्यू; दोघांनी सरपंच म्हणून ३५ वर्षे केले होते नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 11:59 AM2020-10-15T11:59:44+5:302020-10-15T12:05:41+5:30
coronavirus death in Nanded वडवणा पंचक्रोशीत परिचित असलेल्या या दोघा भावंडांना काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.
नांदेड : नांदेड तालुक्यातील वडवणा येथील दोन सख्या भावांचा बुधवारी एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघा भावंडाना उभ्या आयुष्यात तिस-या मित्राची गरज पडली नाही़ त्यांचा एकमेकांत एवढा जीव होता की, शेवटचा श्वासही त्यांनी एकाच दिवशी घेतला़
वडवणा पंचक्रोशीत परिचित असलेल्या या दोघा भावंडांना काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. यातील ७८ वर्षीय धाकट्या भावावर नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तर ८० वर्षीय मोठ्या भावाला लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोघांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू असताना कुटुंबियाचीही मोठी ओढाताण झाली. मात्र तरीही दोघे कोरोनावर मात करून सुखरूपपणे बाहेर येतील अशी कुटुंबियासह ग्रामस्थांनाही अपेक्षा होती. डॉक्टरांनी दोघांनाही वाचविण्यासाठी शथीर्चे प्रयत्न केले. मात्र उपचारास प्रतिसाद न दिल्याने या दोन्ही भावांचा बुधवारी एकाच दिवशी मृत्यू झाला.
बुधवारी सकाळी नांदेड येथे उपचार घेत असलेल्या भावाचा मृत्यू झाला़ त्यानंतर अवघ्या तासाभरातच लातूर येथे उपचारादरम्यान मोठा भाऊही दगावल्याचे वृत्त आल्याने कुटुंबियासह ग्रामस्थांवरही एकच आघात झाला़ नांदेड येथे मृत्यूमुखी पडलेल्या भावावर गोवर्धन घाट स्मशानभूमीत शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले़ तर लातूर येथे मृत्यू झालेल्या भावावर प्रशासनाच्या वतीने तेथेच अंत्यसंस्कार झाले़ नांदेड येथील अंत्यसंस्कार प्रसंगी मुलगा-मुलीसह काही नातेवाईक उपस्थित होते़ मात्र लातूर येथील भावाचा अंत्यसंस्कार नातू असलेला लातूर येथील डॉक्टरच्या उपस्थितीत पार पडला़ या अंत्यसंस्काराला वडवणा येथून एकालाही जाता आले नाही़ विशेष म्हणजे हे दोन्ही भाऊ गावाच्या विकासासाठी कायम आग्रही राहिले. त्यामुळेच ग्रामस्थांनीही त्यांच्यावर भरभरून प्रेम केले होते. मोठ्या भावाने सरपंच म्हणून सुमारे २५ वर्षे गावाची धुरा सांभाळली. तर लहान भावानेही १० वर्षे गावाचा सरपंच म्हणून नेतृत्व केले. या दोघाही जणांचा एकाच दिवशी एकाच आजाराने वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे़
रेल्वेचे तीन डबे अनकपलिंग झाल्याने मागेच राहिले. https://t.co/VO4Vd4C1KT
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) October 14, 2020