वीज पडून दोन म्हशी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:18 AM2021-05-07T04:18:41+5:302021-05-07T04:18:41+5:30
पाणीटंचाई आढावा बैठक नायगाव - तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी शुक्रवार ७ मे रोजी पंचायत समिती कार्यालयात आ.राजेश पवार यांच्या ...
पाणीटंचाई आढावा बैठक
नायगाव - तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी शुक्रवार ७ मे रोजी पंचायत समिती कार्यालयात आ.राजेश पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीस तालुक्यातील सर्व ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवकांनी उपस्थित रहावे असे आवाहन गटविकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड यांनी केले आहे.
पाच ब्रास वाळू मोफत द्या
नांदेड - धर्माबाद तालुक्यात प्रधानमंत्री व रमाई घरकुल आवास योजनेतून घर बांधकाम करणाऱ्यांना ५ ब्रास मोफत वाळू देण्यात यावी अशी मागणी होत आहे. या सदंर्भात जिल्हाधिकारी व तहसीलदारांना वारंवार निवेदन देण्यात आले. वाळूचे भाव वाढल्यामुळे ते खरेदी करणे अशक्यप्राय बनले असून वाळूअभावी घरकुलाची कामेही रखडली आहेत. येणाऱ्या काळात लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
रुग्णवाहिकेची सेवा सुरू
भोकर - येथील ग्रामीण रुग्णालयाची १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका गेल्या अनेक दिवसांपासून बंद होती. या संदर्भात तक्रारी केल्यानंतर रुग्णवाहिका दुरुस्त करण्यात येवून ती पुन्हा सेवेत कार्यरत करण्यात आली.
रस्त्यावर मोठमोेठे खड्डे
देगलूर - तालुक्यातील हनुमान हिप्परगा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पाच कि.मी. अंतरावर खड्डे असल्याची तक्रार आहे. खड्डयामुळे किरकोळ अपघातही वाढले आहेत. संबंधितांनी खड्डे बुजवण्याची मागणी होत आहे.
बोरवाडीत कोरोना लसीकरण
भोकर - भोकर तालुक्यातील बोरवाडी येथे ५ मे रोजी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. यावेळी आनंदराव वानोळे, डॉ.किशोर पाटील, डॉ.हरोडे, प्रकाश चांडोळकर, पार्वतीबाई वागतकर, शेषराव पाटील आदी उपस्थित होते.
मुखेडात निषेध
मुखेड- पश्चिम बंगाल येथील घटनेचा मुखेड येथे भाजपाच्या वतीने निषेध करण्यात आला. या आंदोलनात जिल्हा सरचिटणीस डॉ.माधवराव उच्चेकर, शहराध्यक्ष किशोर चौव्हाण, माजी पं.स. सदस्य राजू बोडके आदी उपस्थित हाेते.
टरबुजाला कवडीमोल दर
अर्धापूर - संचारबंदी व लॉकडाऊनमुळे टरबुज खरेदीकडे ग्राहक नसल्याने कवडीमोल दराने टरबुजाची विक्री करण्याची वेळ संबंधितांवर आली. तोडल्यानंतर केवळ दोन ते तीन दिवस टरबुज चांगले राहते. शेतात टरबुज ठेवले तरी ते खराब होतात. अशा दुहेरी कचाट्यात शेतकरी सापडले आहेत. लागवडीचा खर्च निघणेही अवघड झाले आहे.
स्वस्त धान्य दुकानात गर्दी
नांदेड - शहरातील विजयनगर, आंबेडकरनगर, गणेशनगर, शिवाजीनगर, वजिराबाद भागातील स्वस्त धान्य दुकानात लाभाथधारकांसाठी गहू, दाळ, तांदूळ उपलब्ध झाले आहे. धान्याच्या खरेदीसाठी दुकानात गर्दी होत असून काही ठिकाणी नियमांचे पालन होत नसल्याचे दिसते.
मोंढा बाजारातील आवक घटली
नांदेड - संचारबंदीचा परिणाम मोंढा बाजारात झाला असून आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. खरीप हंगाम तोंडावर येवून ठेपला असून शेतकऱ्यांना बियाणे, खते खरेदी करावी लागणार आहेत. जिल्हा प्रशासनाने मोंढा बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे.
मत्स्य व्यवसाय ठप्प
कंधार - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आल्याने मत्स्य व्यवसाय ठप्प झाला आहे. मच्छीमार आर्थिक अडचणीत सापडले असून या व्यवसायातून होणारी लाखो रुपयांची उलाढाल थांबली आहे. कंधार तालुक्यात अनेक ठिकाणी मासे व्यवसाय चालतात. मात्र संचारबंदीमुळे व्यवसाय ठप्प झाल्यामुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली.
अवैध वृक्षतोड वाढली
नायगाव - नायगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड वाढली आहे. वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे. तालुक्यातील विविध ठिकाणी आंबा, चिंच, लिंबू, बाभूळ आदी विविध प्रकारच्या झाडांची कत्तल करून कृष्णूर येथील काही कंपन्यांना आणि बाहेर वीटभट्टी चालकांना विक्री केली जात आहे. काही गावात एकत्र साठवून बाहेरच्या जिल्ह्यात विक्री केली जाते.
सय्यद मैनोद्दीन सेवानिवृत्त
नांदेड - महावितरण कंपनीतील लाईनमन सय्यद मैनोद्दीन सेवानिवृृत्त झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. अध्यक्षस्थानी सहाय्यक अभियंता सुरेश गंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून शाखा अभियंता बळवंत बोधनकर, भावे, कंत्राटदार आष्टे, पोलीस पाटील इब्राहीम पटेल उपस्थित होते.
माहूरमध्ये भाजपाकडून निषेध
माहूर - पश्चिम बंगालमधील घटनेचा माहूर तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी निषेध केला. यावेळी शाम भारती महाराज, सुमीत राठोड, विजय आमले, अनिल वाघमारे, नंदकुमार जोशी, बंसी गोपाल अग्रहारी, ज्योतीराम राठोड, कांतराव घोडेकर, संजय पवार, दिनेश येवूतकर, महामुने, अविनाश भोयर, कुलदीप घोडेकर, पुरुषोत्तम लांडगे, महिला आघाडीच्या अर्चना दराडे, पद्मा गीरे, शरद भडंगे आदी उपस्थित होते.