दोन मुलांचा बुडून मृत्यू
By admin | Published: May 30, 2017 06:22 PM2017-05-30T18:22:51+5:302017-05-30T18:22:51+5:30
नायगाव बाजार- नायगाव तालुक्यातील कोकलेगाव येथे नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. 30 - नायगाव बाजार- नायगाव तालुक्यातील कोकलेगाव येथे नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या दोन्ही मुलांना पोहता येत नव्हते तरीही ते नदीत उतरले होते. या घटनेमुळे कोकलेगावावर शोककळा पसरली आहे.
अविनाश दिगांबर डोईफोडे हा इज्जतगाव येथे इयत्ता सातवीत शिकत होता़ सुट्यामुळे तो मावशीच्या गावी नायगाव तालुक्यातील कोकलेगाव येथे आला होता़ या ठिकाणी शेजारी असलेल्या परबत मसनाजी शेळके (१४) या मुलासोबत तो सोमवारी सायंकाळी खेळत होता़ खेळल्यानंतर दोघेही जण पोहण्यासाठी गोदावरी नदीवर गेले़ त्यानंतर दोघेही पाण्यात उतरले़ यावेळी पाण्याच्या खोलीचा नेमका अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. परिसरात त्यावेळी कुणी नसल्यामुळे त्यांना कुणी वेळेवर मदतही करु शकले नाही़ ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. मुले घरी परत न आल्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला होता. रात्री नदीपात्राजवळ दोघांचेही कपडे आढळले. त्यानंतर गावातीलच काही तरुणांनी पाण्यात उतरुन शोध घेतला़ यावेळी परबत शेळके याचे प्रेत सापडले, परंतु अविनाश मात्र सापडत नव्हता. रात्री उशिरा गावकऱ्यांनी शोधकार्य थांबविले. त्यानंतर मंगळवारी सकाळी पुन्हा शोध सुरु करण्यात आला़ त्यावेळी अविनाशचेही प्रेत सापडले. याप्रकरणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.