४० लाखांची लाच स्वीकारणारे दोन लिपिक जेरबंद
By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: November 23, 2024 12:03 AM2024-11-23T00:03:46+5:302024-11-23T00:04:21+5:30
मुख्याध्यापकांसह तिघांवर गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, नांदेड : शहरातील एका निवासी दिव्यांग कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन काढून देण्यासाठी ४० लाखांची लाच स्वीकारताना अपंग विद्यालयातील दोन लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई २२ नोव्हेंबर रोजी करण्यात आली.
छत्रपती शाहू महाराज निवासी अपंग महाविद्यालय, काबरानगर नांदेड येथील लिपिक शिवराज बामणे व कुंटूरकर निवासी दिव्यांग कार्यशाळा राज कॉर्नर नांदेड येथील लिपिक चंपत आनंदराव वाडेकर असे लाच स्वीकारताना पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत नांदेड येथील कुंटूरकर निवासी दिव्यांग कार्यशाळेतील एका कर्मचाऱ्याने १३ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
कुटूंरकर निवासी दिव्यांग कार्यशाळा येथील कर्मचाऱ्याचे वेतन प्रलंबित होते. हे वेतन समाजकल्याण अधिकाऱ्यांकडून मंजूर करून घेण्यासाठी आरोपी यादव सूर्यवंशी, शिवराज बामणे व वैभव निवासी शाळेचे मुख्याध्यापक यादव मसनाजी सूर्यवंशी यांनी तक्रारदाराकडे ५४ लाखांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर तक्रारदाराने आरोपीस ४८ लाख रूपये देण्याचे ठरले.
त्यानंतर तक्रारदार याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी कार्यवाही केली असता पडताळणीत या तिघांनीही तक्रारदार यांना प्रत्यक्ष व फोनद्वारे वेळोवेळी प्रलंबित बिल अदा केल्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी केल्याचे आढळून आले. त्यानंतर २२ नोव्हेंबर रोजी आरोपी शिवराज बामणे, चंपत वाडेकर या दोघांनी छत्रपती चौकाजवळ तक्रारदाराकडून ४० लाखांची लाचेची रक्कम स्वीकारली.
भाग्यनगर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा
लाच स्वीकारणाऱ्या लिपिक शिवराज बामणे व चंपत वाडेकर यांच्यासह मुख्याध्यापक यादव सुर्यवंशी यांच्याविरूद्ध भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.