गांजेगाव बंधाऱ्याचे दोन गेट उघडले; दहा गावांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:01 AM2018-12-14T01:01:29+5:302018-12-14T01:01:51+5:30
इसापूर धरणातून सोडलेले पाणी गांजेगाव बंधा-याच्या वरील शेतक-यांनी अडविले होते़ त्यामुळे खालील ८ ते १० गावच्या शेतकयांनी गेट काढून सहस्त्रकुंडपर्यंत पाणी सोडण्याची मागणी केली होती़
हिमायतनगर : इसापूर धरणातून सोडलेले पाणी गांजेगाव बंधा-याच्या वरील शेतक-यांनी अडविले होते़ त्यामुळे खालील ८ ते १० गावच्या शेतकयांनी गेट काढून सहस्त्रकुंडपर्यंत पाणी सोडण्याची मागणी केली होती़ त्यानुसार १३ डिसेंबर रोजी पोलीस बंदोबस्तात बंधा-याचे दोन गेट काढून पाणी सोडण्यात आले़
इसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडा, या मागणीसाठी ९० गावच्या शेतक-यांनी १५ दिवस आंदोलन केल्याने महाराष्ट्राचे ७ दलघमी आणि विदर्भातील ५ दलघमी असे एकूण १२ दलघमी पाणी सोडण्याचे आदेश प्रशासनाने दिले. त्यानुसार पाणीही सोडण्यात आले़ परंतु वरील गावच्या शेतक-यांनी गांजेगाव बंधा-याचे गेट लाऊन पाणी अडविले़ त्यामुळे पाणी टेलपर्यंत म्हणजे सहस्त्रकुंडपर्यंत पोचलेच नाही. त्यामुळे अंदोलनामध्ये सहभागी होऊनही पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ बंधा-याच्या खालील गावक-यांवर आली होती. हि बाब लक्षात घेऊन गांजेगावच्या बंधा-याचे गेट काढून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचवावे, अशी मागणी सिरपल्ली, शेलोडा, एकंबा, कोठा, कोठा तांडा, बोरगाडी, धानोरा, वारंगटाकळी, मुरली, बिटरगाव, पिपंळगाव, सावळेश्वर आदी गेटच्या खालील गावातील गावक-यांनी एका निवेदनाद्वारे उमरखेड आणि हिमायतनगर तहसीलदारांकडे केली होती. त्यामुळे पुन्हा पाण्याचा वाद निर्माण होऊ नये, आणि बंधा-याचे गेट लावणा-या वरील आणि गेटखालील गावक-यांमध्ये पाण्यासाठी आपसात भांडण होऊ नये, या उद्देशाने प्रशासनाने पाणी टेलपर्यंत पाठवून समान पाण्याचा लाभ नदीकाठावरील गावांना मिळवून दिला आहे.
हिमायतनगरचे तहसीलदार आशिष बिराजदार आणि उमरखेडचे तहसीलदार भगवान कांबळे यांनी १३ डिसेंबर रोजी दुपारी पोलीस बंदोबस्तात गंजेगाव बंधा-याचे गेट काढून पाणी सोडले़ ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग उमरखेडेचे विनोद पाटील, सहाय्यक अभियंता शाहू, माने, हिमायतनगरचे नायब तहसीलदार राठोड, मंडळ अधिकारी राठोड, पोलीस निरीक्षक सुरेंद्र बोरसे, बिटरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश राऊत आदींसह उमरखेड - हिमायतनगर भागातील गावचे सरपंच उपस्थित होते़ बंधा-याचे २ गेटला लावलेले ८ प्लेट काढून पाणी सोडले आहे. शेवटच्या टोकापर्यंत पाणी जाणार नाही, तोपर्यंत गेट चालू ठेवण्यात यावे अशी मागणी राजू पाटील शेलोडेकर, गणेश शिंदे, अरविंद पाटील, आंबराव जोडगदंड, सुदर्शन पाटील, दिलीप चव्हाण, अवधूत शिंदे, बळीराम देवकते, रामराव कोठेकर, शिवाजी पाटील आदींनी केली़