कर्तव्यात कसूर प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील दोन आरोग्य कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 07:36 PM2020-03-05T19:36:50+5:302020-03-05T19:40:21+5:30
कर्तव्याच्या ठिकाणी गैरहजर आढळले होते कर्मचारी
किनवट (जि. नांदेड) : सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अचानक भेटीवेळी काही जण कर्तव्याच्या ठिकाणी गैरहजर आढळले होते, तर काही मुख्यालयी वास्तव्यास नव्हते. यासह इतर हलगर्जीपणा समोर आला होता. यामुळे आरोग्य विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी २५ फेब्रुवारी रोजी किनवट तालुक्यातील अनेक गावांना अचानक भेटी दिल्या होत्या. यावेळी त्यांनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषदेच्या शाळा, पशुवैद्यकीय दवाखाने, अंगणवाड्या तसेच ग्रामपंचायत कार्यालयांना भेटी देऊन तपासणी केली. यावेळी गैरहजर असणाऱ्या तसेच कामकाजात अनियमितता असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईचे प्रस्ताव संबंधित विभाग प्रमुखांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले होते.
सहायक जिल्हाधिकाऱ्यांचा दणका
सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या भेटीवेळी राजगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळून आलेल्या हलगर्जीपणाचा ठपका ठेवत आरोग्य केंद्राचे औषधनिर्माण अधिकारी बी.डी. सादुलवार आणि कनिष्ठ सहायक चांदू केरबा कंधारे या दोघांवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. मलकापूर, खेरडा आरोग्य उपकेंद्राचे काही कर्मचारीही रडारवर असून काही डॉक्टरांनाही नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी दिली.
लोकांची कामे तत्परतेने होत आहेत की नाहीत? हे तपासण्यासाठीच शासकीय कार्यालयांना अचानक भेटी दिल्या होत्या. तालुक्यातील इतर ठिकाणीही अशाच पद्धतीची मोहीम राबविण्यात येणार आहे.
- अभिनव गोयल, सहायक जिल्हाधिकारी