क्रुझर गोदावरीत कोसळून दोघांचा मृत्यू; जेऊन परतीचा प्रवास सुरु असताना झाला अपघात
By श्रीनिवास भोसले | Published: May 10, 2024 09:38 PM2024-05-10T21:38:40+5:302024-05-10T21:39:45+5:30
थोराजी ऊर्फ बबलू मारूती ढगे (२५) आणि चालक उद्धव आनंदराव खानसोळे (३०) या दोघांचा झाला मृत्यू
श्रीनिवास भोसले, नांदेड: जेवण करून परत येत असताना गोदावरीत क्रुझर कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी मुदखेड तालुक्यातील येळी महाठी पुलावर घडली. मयतांमध्ये थोराजी ऊर्फ बबलू मारूती ढगे (वय २५, रा. येळी) आणि चालक उद्धव आनंदराव खानसोळे (वय ३०, रा. शिखाची वाडी) या दोघांचा समावेश आहे. शिखाचीवाडी येथील चालक उद्धव खानसोळे हे चिलपिंपरी येथे क्रुझर (क्र.एम.एच-२६ बी.क्यू.२०६१) गाडीचे भाडे करून आपल्या मित्राला येळी येथे सोडण्यासाठी जात होते. दरम्यान, येळी महाठी येथील गोदावरीनदीच्या पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ही गाडी पुलावरून २५ ते ३० फूट खोल गोदावरी नदीच्या पात्रात कोसळली.
घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. मुदखेड पोलिसांसह नांदेड येथील अग्निशमन दलाच्या जवानांनाही पाचारण करण्यात आले. परंतु, नदीपात्रात पाणी असल्याने क्रुझर पाण्यात बुडून चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला. पाण्यात बुडालेली क्रुझर परिसरातील नागरिकांनी दोरीच्या सहाय्याने नदीपात्राबाहेर खेचून काढली. या गाडीत असलेल्या दोघांचाही मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. घटनास्थळी मुदखेड ठाण्याचे पोलिस निरीक्षक सप्रे आणि त्यांची टीम तसेच नांदेड येथील अग्नीशमन दलाचे केरोजी दासरे, दिनेश कांबळे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, उमेश ताटे, संग्राम गीते, जीवरक्षक हबीब व इतर जवान पोहोचले होते.