गुरुद्वारा बोर्डाच्या कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:17 AM2021-05-23T04:17:05+5:302021-05-23T04:17:05+5:30
येथील सचखंड गुरुद्वारामध्ये हंगामी व कायमस्वरूपी मिळून सुमारे १३०० कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांत पगार मिळालेला नाही. ...
येथील सचखंड गुरुद्वारामध्ये हंगामी व कायमस्वरूपी मिळून सुमारे १३०० कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांत पगार मिळालेला नाही. याबाबत बोर्डाचे अध्यक्ष भुपिंदरसिंघ मनहास व अधीक्षक गुरुविंदरसिंघ वाधवा यांना विचारणा केली. तेव्हा बजेट मंजूर नसल्याचे कारण सांगितले. हे बजेट मंजूर करण्यासाठी बोर्डाची बैठक होणे आवश्यक आहे.
गुरुद्वारा बोर्डाची बैठक ३१ मार्च रोजी होणार होती; पण त्याआधी २९ मार्च रोजी हल्ला मोहल्लाच्या दिवशी झालेल्या घटनेनंतर बोर्डाचे निर्वाचित तीन सदस्य रविंद्रसिंघ बुंगई, मनप्रीतसिंघ कुंजीवाले आणि गुरमितसिंघ महाजन व अधीक्षक दिनपूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारणाने ३१ मार्चच्या बैठकीला हे तीन सदस्य उपस्थित राहू शकले नाहीत. म्हणून ती बैठकच रद्द झाली, असे कामठेकर व कोटीतीर्थवाले यांनी म्हटले आहे.
तसेच बोर्डाच्या अन्य नऊ जागा रिक्त आहेत. त्यामुळे बैठकीचा कोरम पूर्ण होऊ शकत नाही. बैठक नाही म्हणून बजेट नाही. बजेट नाही म्हणून पगार नाही. या स्थितीमुळे बोर्डातील सुमारे १३०० कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांत पगार मिळालेला नाही. ही कठीण परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने गुरुद्वारा बोर्डाच्या कर्मचाऱ्यांचा थकीत पगार त्वरित द्यावा, अशी मागणी यांनी केली आहे.
बोर्डाच्या तीन सदस्यांना बैठकीस उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी. तसेच अन्य नऊ रिक्त जागा राज्य शासनाने त्वरित भराव्यात, अशीही मागणी दशमेश चॅरिटेबल ट्रस्टने पालकमंत्री चव्हाण यांच्याकडे केली आहे.
या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रधान सचिव, महसूल सचिव, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि अधीक्षक गुरुविंदरसिंघ वाधवा यांना पाठविण्यात आली आहे.