७२ अत्यवस्थ बालकांसाठी दोन परिचारिका; नांदेडच्या रुग्णालयातील विदारक चित्र

By शिवराज बिचेवार | Published: October 4, 2023 06:14 PM2023-10-04T18:14:03+5:302023-10-04T18:16:19+5:30

बालकांवर उपचार करताना परिचारिका जिवापाड मेहनत घेत असल्या तरी प्रत्यक्षात त्यांनाही मर्यादा येत आहेत.

Two nurses for 72 critically ill children; A shocking picture from a hospital in Nanded | ७२ अत्यवस्थ बालकांसाठी दोन परिचारिका; नांदेडच्या रुग्णालयातील विदारक चित्र

७२ अत्यवस्थ बालकांसाठी दोन परिचारिका; नांदेडच्या रुग्णालयातील विदारक चित्र

googlenewsNext

नांदेड : विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या तीन दिवसांत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात २० हून अधिक नवजात बालकांचा समावेश आहे. या ठिकाणी असलेल्या अतिदक्षता विभागात तब्बल ७२ अत्यवस्थ बालकांवर उपचार सुरू आहेत, तर त्यांच्या देखभालीसाठी मात्र केवळ दोन परिचारिका आहेत. त्यामुळे कुणाला इंजेक्शन द्यावे अन् कुणाला सलाईन अशा गोंधळात या परिचारिकांची चांगलीच दमछाक होत आहे. त्यातही एका वाॅर्मरमध्ये तीन बालकांना ठेवावे लागत असल्याने संसर्गाचीही शक्यता नाकारता येत नाही.

शासकीय रुग्णालयात दररोज रुग्णांचे मृत्युसत्र सुरू आहे. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. नेते, मंत्री आले, पाहणी करून गेले. परंतु, परिस्थितीत अद्यापही सुधारणा नाही. बुधवारीही अनेक रुग्ण चिठ्ठी घेऊन बाहेरून औषधी आणत असल्याचे चित्र होते, तर पिण्याच्या पाण्यासाठीही अनेकजण शोधाशोध करीत हाेते. त्यात तीन दिवसांत झालेल्या ४१ मृत्यूंमध्ये २० हून अधिक नवजात बालकांचा समावेश आहे. यातील बहुतांश बालके ही कमी वजनाची आहेत. यातील काही बालकांना वॉर्मरमध्ये ठेवण्यात आले आहे. परंतु, वॉर्मरची संख्या अपुरी असल्यामुळे एका वॉर्मरमध्ये कुठे दोन, तर कुठे तीन बालकांना उपचार द्यावे लागत आहेत. त्यातही ७२ अत्यवस्थ बालकांच्या या कक्षात फक्त दोन परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे दोन परिचारिका ७२ बालकांवर कसे लक्ष ठेवणार? या बालकांवर उपचार करताना त्या जिवापाड मेहनत घेत असल्या तरी प्रत्यक्षात त्यांनाही मर्यादा येत आहेत.

वॉर्मर पडले धूळ खात
बालरोग अतिदक्षता विभागासाठी असलेले अनेक वाॅर्मर हे शेजारील एका कक्षात धूळ खात पडून असल्याचे दिसून आले. या वॉमरची देखभाल अन् दुरुस्ती न झाल्याने ते वापराविना पडून आहेत. त्यामुळेच एका वॉर्मरमध्ये अनेक बालकांवर उपचार करण्याची वेळ येत आहे.

चप्पल, बूट घालूनच अतिदक्षता कक्षात
गेल्या तीन दिवसांत अनेक आमदार, मंत्री यांचे शासकीय रुग्णालयात पाहणी दौरे झाले. या पाहणीत बहुतांश जणांनी बालरोग अतिदक्षता विभागाला भेट दिली. परंतु, अतिदक्षता विभागात जाण्यापूर्वी चप्पल, बूट काढून ठेवावे लागतात. जेणेकरून नवजात बालकांना धुळीमुळे संसर्ग होऊ नये याची साधी दक्षताही पाळण्यात आली नाही. विशेष म्हणजे नेत्यांसह कार्यकर्त्यांचा कोंडाळाही या कक्षात फिरत होता.

महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांमधील सोयी-सुविधा-सज्जता आणि एकंदर व्यवस्थेला तुम्ही १० पैकी किती गुण द्याल?

दहा (97 votes)
सात ते नऊ (169 votes)
चार ते सहा (556 votes)
एक ते तीन (1314 votes)
शून्य (2156 votes)

Total Votes: 4292

VOTEBack to voteView Results

Web Title: Two nurses for 72 critically ill children; A shocking picture from a hospital in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.