नांदेड शहरातील १८ घरफोडी प्रकरणात दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 04:41 PM2020-01-02T16:41:02+5:302020-01-02T16:45:57+5:30
आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
नांदेड : शहरात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेली घरफोडीची मालिका उघडकीस आणण्यास अखेर पोलिसांना यश आले असून या प्रकरणात दोघांना स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली आहे़ त्यांच्याकडून तब्बल ३० तोळे सोने आणि ५ दुचाकी हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली़
शहरात गेल्या काही दिवसात लुटमार व घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या़ या घटनांच्या तपासात स्थानिक गुन्हा शाखेचे पथके तयार करण्यात आली होती़ या पथकाने गुप्त माहितीनुसार सराईत गुन्हेगार संजय उर्फ समीर पंडित नामनूर (वय २८, रा़महबुबनगर, नांदेड) आणि सय्यद हानीफ उर्फ हनी सय्यद जाफर (वय २०, रा़महबुबनगर, नांदेड) या दोघांना ताब्यात घेतले़ त्यांची विचारपूस केली असता या दोघांनी शहरात शिवविजय कॉलनी, संभाजीरोड, कॅनॉलरोड, चैतन्यनगर, वैशालीनगर तरोडा बु़, मंत्रीनगर, दीपनगर, संकेतनगर,बेलानगर, स्वस्तिक नगर, सहयोगनगर, आनंद नगर अशा ठिकाणी मागील दोन वर्षामध्ये घरफोड्या केल्याची कबुली दिली़
तसेच ज्ञानेश्वर नगर व आनंद नगर या ठिकाणाहून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याचे सांगितले़ काबरानगर व इतर ठिकाणाहून या दोघांनी दोन बुलेट, एक एफझेड, एक अॅक्टीव्हा अशा पाच दुचाकी लंपास केल्याचे सांगितले़ पोलिसांकडून घटनास्थळाची पडताळणी करण्यात आली आहे़ या दोन आरोपीकडून १८ गुन्ह्यांचा उलगडा झाला असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिस अधीक्षक मगर यांनी सांगितले़