कोराडीतील दोन वीजनिर्मिती संच बंद; विदर्भ-मराठवाड्यात इमर्जन्सी लोडशेडिंग सुरू 

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: September 2, 2023 12:59 PM2023-09-02T12:59:05+5:302023-09-02T13:30:01+5:30

तब्बल १३०० मेगावॅट वीजनिर्मिती ठप्प झाल्याने लोडशेडिंग वाढविण्यात आले आहे

Two power generation sets in Koradi closed; Emergency load shedding started in Vidarbha-Marathwada | कोराडीतील दोन वीजनिर्मिती संच बंद; विदर्भ-मराठवाड्यात इमर्जन्सी लोडशेडिंग सुरू 

कोराडीतील दोन वीजनिर्मिती संच बंद; विदर्भ-मराठवाड्यात इमर्जन्सी लोडशेडिंग सुरू 

googlenewsNext

नांदेड : सध्या महाराष्ट्रातील विविध औष्णिक केंद्रांवरील वीजनिर्मिती कमी झाल्याने आळीपाळीने महाराष्ट्रातील विविध भागांतून वीजभार कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या नांदेड विभागातून ५० मेगावॅट विजेचा लोड कमी करण्यासाठी इमर्जन्सी लोडशेडिंग सुरू केले आहे. कोराडीतील दोन संच बंद असल्यामुळे जवळपास १,३०० मेगावॅट वीजनिर्मिती ठप्प झाली आहे. यापूर्वी विदर्भातील ५०० मेगावॅट विजेचा लोड पुसद, जयसिंगपूर, छत्रपती संभाजीनगर, साकोली, श्रीरामपूर यासह १३ उपकेंद्रांवरून कमी करण्यात आला होता. आता नांदेड, परभणी, हिंगोलीसह मराठवाड्यातील अनेक भागांतून ३५ ते ५० मेगावॅट विजेची बचत करणे सुरू आहे.

जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतातील कृषिपंप तसेच घरगुती उपकरणे कूलर, फॅन, एसी पुन्हा सुरू झाल्याने त्याचा परिणाम महावितरणच्या वीज वितरण प्रणालीवर जाणवत आहे. मागील काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात दिवस व रात्रीच्या वेळेला इमर्जन्सी लोडशेडिंग वाढल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या महाराष्ट्र भारनियमनमुक्त असला तरी ग्रामीण भागातील लोडशेडिंग मात्र सुरू आहे. पावसाळा सुरू असूनही विजेचा वापर वाढल्याने सर्वच ठिकाणी फिडरवर भार येत आहे. ग्रामीण भागात दिवसातून चार ते पाच वेळा वीज खंडित केली जाते.

नांदेड ग्रामीणमध्ये येत असलेल्या लोहा, कंधार, नांदेड ग्रामीण, मुदखेड व अर्धापूर या भागात इमर्जन्सी लोडशेडिंग वाढली आहे. एखाद्या फिडरवर लोड वाढला की, लोड देण्यास सांगितले जाते. सध्या ज्या ठिकाणी वीजनिर्मिती होते, तेथे वीजनिर्मिती कमी आणि मागणी जास्त, पुरवठा तेवढाच यामुळे राज्यातील सर्व भागात आळीपाळीने इमर्जन्सी लोडशेडिंग सुरू करण्यात आलेले आहे. महावितरणने इमर्जन्सी लोडशेडिंग करताना कुठलेही वेळापत्रक केले नसल्याने अनेकजण याबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे शेतकरी व व्यावसायिक आपला रोष महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर काढत आहेत. संवेदनशील उपकेंद्रांमध्ये सुरक्षा रक्षक नियुक्त करावे, प्रादेशिक कार्यालयाने सूचित केल्यानंतरही सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केली नसल्यामुळे दिवस-रात्र पाळीवरील यंत्रचालकांना अनेकांचा रोष पत्करावा लागत आहे. पावसाळ्यामुळे बाहेरील वीज खरेदी बंद असल्याने त्याचा परिणाम लोड वाढून लोडशेडिंगवर होत आहे. निर्मिती कमी आणि मागणी जास्त यामुळे वीज बचतीसाठी महावितरणकडून प्रयत्न सुरू आहेत.

कोराडी येथील दोन संचाची देखभाल, दुरुस्ती
संचाची देखभाल करण्यासाठी कोराडी येथील वीजनिर्मितीचे दोन संच बंद ठेवण्यात आल्याची माहिती आहे. दोन विद्युत संच बंद असल्यामुळे प्रत्येकी ६६० मेगावॅट म्हणजे १,३२० मेगावॅट वीजनिर्मिती ठप्प झाली आहे. सदर संच सुरू होण्यासाठी किमान एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे.

३ फेज ऐवजी सिंगल फेज
ज्या भागात ३ फेज विजेचा पुरवठा होत होता, त्या ठिकाणी आता सिंगल फेज विजेचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. नांदेड परिमंडळातून दररोज ५० मेगावॅट विजेचा लोड कमी करून देण्यात येत आहे. त्यामुळे दिवसातून एक ते दोन तास इमर्जन्सी लोडिंग करण्यात येत आहे. नांदेड विभागात एक ते दोन तास इमर्जन्सी लोडशेडिंग करून ३५ ते ५० मेगावॅट विजेचा भार कमी केला जात आहे.
- सुधाकर जाधव, अधीक्षक अभियंता महावितरण नांदेड

Web Title: Two power generation sets in Koradi closed; Emergency load shedding started in Vidarbha-Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.