कारागृह अधीक्षकांना शिवीगाळ करणारे दोन तुरुंग अधिकारी आणि शिपाई निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:01 PM2020-12-12T16:01:46+5:302020-12-12T16:05:20+5:30
घडलेल्या प्रकरणाचा सविस्तर अहवाल कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठविला होता.
नांदेड- जिल्हा कारागृह अधीक्षक यांच्या निवासस्थानी जावून दोन तुरुंग अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याने दारुच्या नशेत अधीक्षकांना शिवीगाळ केल्याचा प्रकार ५ डिसेंबर रोजी घडला होता. या प्रकरणी पुण्याच्या कारागृह अतिरिक्त महासंचालकांनी तिन्ही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
नांदेड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक रामराजे चांदणे हे शासकीय कर्तव्य बजावून ५ डिसेंबर रोजी आपल्या शासकीय निवासस्थानी गेले असता कार्यालयीन कामकाजाचे कारण पुढे करीत तुरुंग अधिकारी उत्तरेश्वर निवृत्ती गायकवाड, किशोर महादेव वारके आणि शिपाई सचिन शंकरराव पिंगलवार हे कुठलीही परवानगी न घेता अधीक्षकांच्या घरात घुसले. यावेळी चांदणे हे पत्नी व मुलीसोबत घरात चर्चा करीत बसले होते. समोर महिला असतानाही या दोन्ही तुरुंग अधिकाऱ्यांसह शिपायाने अधीक्षकांना शिवीगाळ सुरू केली. एवढेच नव्हे तर चांदणे यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. या प्रकरणी ५ डिसेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास वजिराबाद पोलीस ठाण्यात रामराजे चांदणे यांच्या फिर्यादीवरुन वरील तिघांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. वजिराबाद पोलिसांना अद्यापपर्यंत हे तिन्ही आरोपी सापडलेले नाहीत. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार जाधव करीत आहेत.
दरम्यान, घडलेल्या प्रकरणाचा सविस्तर अहवाल कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठविला होता. या अहवालावरुन अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारागृह) पुणे यांनी तुरुंगाधिकारी उत्तरेश्वर गायकवाड, किशोर वागरे आणि सचिन पिलंगवार या तिघांवर निलंबनाची कारवाई केली. वरिष्ठांशी हुज्जत घालणे, कर्तव्यात कसूर करणे तसेच कारागृह प्रशासनाची बदनामी होईल, असे कृत्य करणे असा ठपका या तिघांवरही ठेवण्यात आला आहे.