दोन सक्शन पंप स्फोटाने उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 12:06 AM2019-05-04T00:06:29+5:302019-05-04T00:11:29+5:30

मौजे वासरी येथे रेती उपसा करण्यासाठी आढळून आलेल्या दोन सक्शन बोटी वाळूमाफियांनी नदीपात्रातून पळविल्या़ महसूलच्या पथकाचा कडा पहारा असताना त्यांच्या हातावर तुरी देत या बोटी किकीमार्गे पुन्हा वासरीला आणण्यात आल्या़

Two suction pumps blasted | दोन सक्शन पंप स्फोटाने उडविले

दोन सक्शन पंप स्फोटाने उडविले

Next
ठळक मुद्देवासरी येथील घटनावाळूमाफियांचा महसूल अन् पोलीस प्रशासनाला चकवा; अंधारात झाली पायपीट

नांदेड : मौजे वासरी येथे रेती उपसा करण्यासाठी आढळून आलेल्या दोन सक्शन बोटी वाळूमाफियांनी नदीपात्रातून पळविल्या़ महसूलच्या पथकाचा कडा पहारा असताना त्यांच्या हातावर तुरी देत या बोटी किकीमार्गे पुन्हा वासरीला आणण्यात आल्या़ या बोटी शोधण्यासाठी महसूलच्या पथकाला अंधाऱ्या रात्रीत गोदापात्र पिंजून काढावे लागले़ शुक्रवारी अखेर या दोन्ही बोटी जिलेटीनच्या स्फोटाने उडविण्यात आल्या़
२३ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाने राहेगाव, वासरी, शंकतीर्थ येथे अवैधरित्या वाळू उपसा करणाºया सक्शन पंपाला जिलेटीनने उडवले होते़ तसेच भनगी, गंगाबेट येथे गोदावरी नदीतून वाळू वाहून नेण्याचे ताफे, टोकरे जाळून टाकण्यात आले.
जिल्ह्यात वाळूघाटांची लिलाव प्रक्रिया सुरू असली तरी, अवैध वाळू उपसा करणाºया माफियांनी आपले जाळे विस्तृतपणे पसरवले आहे. नांदेड, मुदखेड यासह नायगाव, देगलूर, बिलोली या तालुक्यांतही मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा सुरू आहे. जिल्ह्यात परवानगी दिलेल्या घाटावरही सक्शन पंपाने वाळू उपसा करण्यास परवानगी नाही. असे असताना अवैधरित्या सक्शन पंपाद्वारे वाळू उपसली जात आहे.
ज्या घाटांचा लिलाव झाला नाही, ज्या घाटांना वाळू उपशाची परवानगी मिळाली नाही, त्या ठिकाणी वाळूमाफिया मनमानी पद्धतीने स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी यांना हाताशी धरुन आपला गोरखधंदा सुरू करीत आहेत. असे करताना चक्क सक्शन पंपाचा वापर करण्यापर्यंत मजल गेली होती. दरम्यान, २ मे रोजी मुदखेडचे तहसीलदार हे पथकासह गस्त करीत असताना त्यांना मौजे वासरी येथे दोन सक्शन पंप दिसून आले़ परंतु पथकाला पाहताच वाळूमाफियांनी या बोटी नांदेड तालुक्यातील मौजे किकी शिवारात एका नाल्यामध्ये नेवून ठेवल्या होत्या़
त्यानंतर मुदखेड आणि नांदेड तहसील पथकाने शोधमोहीम राबवित त्या शोधून काढल्या़ परंतु रात्रीच्या वेळी जिलेटीनचा स्फोट करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती न मिळाल्याने या बोटी नष्ट करता आल्या नाहीत़
त्यामुळे या बोटीजवळ रात्रीच्या वेळी मुदखेड व नांदेड तहसीलचे कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ परंतु मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत वाळू माफीयांनी या दोन्ही बोटी नदीपात्रातून मुदखेड तालुक्याच्या हद्दीत पळवून नेल्या़ एवढा बंदोबस्त असताना बोटी पळविल्याच कशा? या प्रश्नामुळे महसूल प्रशासनही गोंधळात पडले होते़ त्यानंतर मुदखेडचे तहसीलदार दिनेश झांबले व नांदेडचे प्रभारी तहसीलदार मुगाजी काकडे यांनी मध्यरात्री महसूल व पोलिसांच्या पथकाने मुदखेड तालुक्यातील मौजे आमदुरा, शंखतीर्थ व वासरी शिवारात नदीपात्र पिंजून काढले़
रात्री दीड वाजेच्या सुमारास या दोन्ही बोटी मौजे वासरी शिवारात आढळून आल्या़ वाळू माफियांनी या दोन्ही बोटी पाण्यात बुडून ठेवल्या होत्या़ त्यानंतर रात्रभर बोटीजवळ पोलीस आणि महसूलच्या कर्मचाऱ्यांनी पहारा दिला़ शुक्रवारी दुपारी क्रेनच्या सहाय्याने या दोन्ही बोटी बाहेर काढण्यात आला़ त्यानंतर दुपारी जिलेटीनच्या स्फोटाने सदर बोटी सक्शन पंप नष्ट करण्यात आले़ यावेळी पोलीसही हजर होते़
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण, भोकरचे पवन चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार दिनेश झांबले, प्रभारी तहसीलदार मुगाजी काकडे, सपोनि खंडागळे, बी़डीक़व्हाडे, अनिरुद्ध जोंधळे, चंद्रशेखर सहारे, मगरे, मोरे, अन्नमवाड, कटारे, देवापूरकर, प्रदीप पाटील, आकाश कांबळे, सचिन नरवाडे, रवी पल्लेवाड, उमाकांत भांगे, नारायण गाडे, गवळी, कोतवाल, श्रीधर पाटील, राजीव गुंतले, कुकडे, शिंदे यांनी ही कारवाई केली़ दरम्यान, अवैध रेती उपशाच्या विरोधात जिल्हा प्रशासनाने मोहीम आणखी तीव्र केली आहे़
पथकाच्या हातावर दोन वेळेस तुरी
मुदखेड तहसीलच्या पथकाला सुरुवातीला मौजे वासरी शिवारात दोन बोटी दिसून आल्या होत्या़ परंतु, पथकाला पाहताच वाळू माफियांनी या बोटी किकी शिवारात नाल्यात लपून ठेवल्या़ पथकाने या ठिकाणच्या बोटी शोधून रात्री पहारा लावला़ परंतु, अंधाराचा फायदा घेत त्या ठिकाणाहून बोटी नदीपात्रातून पळवून नेवून मुदखेड तालुक्यातील मौजे वासरी येथे नदीपात्रात बुडवून ठेवण्यात आल्या होत्या़ या ठिकाणीही रात्रभर पहारा ठेवण्यात आला़ मौजे वासरीच्या पहा-याचा अनुभव असल्यामुळे यावेळी महसूल आणि पोलीस कर्मचारी डोळ्यात तेल घालून पहारा देत होते़

Web Title: Two suction pumps blasted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.