दारूने भरलेले दोन ट्रक पकडले; एस.एस.टी. पथकाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 11:51 PM2024-04-15T23:51:31+5:302024-04-15T23:52:03+5:30
१ कोटी ५८ लाखांचा मुद्देमाल जप्त
जांब बु. (नांदेड) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदेशी दारूने भरलेले दोन ट्रक सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास पकडले. ही कारवाई लातूर-नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या मुखेड तालुक्यातील जांब (बु.) चेक पोस्टवर एस.एस.टी. पथकाने केली.
जांब बु. या गावानजीक लोकसभा निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणीसाठी उभारण्यात आलेल्या चेक पोस्टवर तपासणीसाठी पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकाला ट्रकमधील संशयास्पद माल वाटल्याने त्यांनी ट्रकची तपासणी केली असता विदेशी दारूने भरलेला साठा आढळून आला. यावेळी दारूचे बाॅक्स भरून धर्माबादकडून लातूरकडे ट्रक क्रमांक एम.एच.२६ बी.ई.०७०७ व ट्रक क्रमांक एम.एच.०९ ओ.यू.८९७९ हे दोन ट्रक जात असताना एस.एस.टी. पथकास संशय आला. तपासणी केली असता दारूचे बाॅक्स असल्याचे आढळून आले. एका ट्रकमध्ये ८२ लाखांचा, तर दुसऱ्या ट्रकमध्ये ७६ लाखांचा दारूसाठा पोलिसांनी जप्त केला. सदर दारूसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल ऑफिसर संजीव सुरवसे, सहायक नोडल ऑफिसर व्ही.बी. कानवटे, एस.जी. माळी, पोलिस जमादार पंडित राठोड, मन्मथ गोंड यांच्या पथकाने केली.
जांब बु. येथील तपासणी पथकाने दोन दारू वाहतूक करणारे ट्रक संशयित असल्याने पकडले आहेत. पुढील कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहेत. -राजेश जाधव, तहसीलदार, मुखेड