दुचाकीस्वाराचा मृत्यू, महिला पोलीस जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:48 AM2018-10-17T00:48:21+5:302018-10-17T00:48:34+5:30
दसरा साजरा करण्यासाठी आपल्या गावी जाणाऱ्या दांपत्य कुटुंबाच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर महिला पोलीस कर्मचारी असलेली मयताची पत्नी गंभीर जखमी झाली तर दीड वर्षांची मुलगी किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी भोकर-किनवट रस्त्यावरील सुधा प्रकल्पाच्या वळणावर घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकर: दसरा साजरा करण्यासाठी आपल्या गावी जाणाऱ्या दांपत्य कुटुंबाच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर महिला पोलीस कर्मचारी असलेली मयताची पत्नी गंभीर जखमी झाली तर दीड वर्षांची मुलगी किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी भोकर-किनवट रस्त्यावरील सुधा प्रकल्पाच्या वळणावर घडली.
हिमायतनगर तालुक्यातील भोनीतांडा येथील रहिवासी असलेले सतीश नामदेव जाधव हे उच्च शिक्षित असल्याने खाजगी शिकवणी करण्यासाठी नांदेडला राहत होते.
सतीश जाधव हे बारड येथे पोलीस कर्मचारी असलेली पत्नी ज्योती आप्पाराव राठोड व दीड वर्षांची मुलगी आराध्यासह दसरा साजरा करण्यासाठी आपली दुचाकी (क्र.एम़एच़२६ ए़एच़१३१) वरुन भोकरमार्गे भोनीतांडा येथे जात असताना किनवट रस्त्यावरील सुधा प्रकल्पाजवळील वळणावर समोरून येत असलेल्या सिमेंटची वाहतूक करणाºया ट्रक (क्र. एम एच २६ ए़डी़२१४७) ने दुचाकीस धडक दिली. भोकर पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक व दुचाकी ताब्यात घेतली असून ट्रकचालक फरार झाला आहे. घटनेतील मयत सतीश जाधव हे भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आप्पाराव राठोड यांचे जावई होत.
दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले होते. जखमींना शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान सतीश नामदेव जाधव (३५, रा. भोनीतांडा) यांचा मृत्यू झाला. तर महिला पोलीस ज्योती जाधव गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले. तर मुलगी आराध्या येथेच उपचार घेत आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी करुन टाहो फोडला होता.