दुचाकी चोरणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 23:55 IST2019-05-26T23:55:26+5:302019-05-26T23:55:57+5:30
तुप्पा परिसरातील जवाहरनगर येथे चोरट्यांकडून पोलिसांनी नऊ मोटारसायकल, एक जीप आणि एक सबमर्सिबल पंप जप्त केले आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हा शाखेने केली आहे.

दुचाकी चोरणारी टोळी गजाआड
नांदेड : तुप्पा परिसरातील जवाहरनगर येथे चोरट्यांकडून पोलिसांनी नऊ मोटारसायकल, एक जीप आणि एक सबमर्सिबल पंप जप्त केले आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हा शाखेने केली आहे.
शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीच्या घटना दोन महिन्यापासून सुरू आहेत. या प्रकरणाच्या तपासाचे आदेश स्थानिक गुन्हा शाखेला पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी दिले होते. या चोरीच्या अनुषंगाने माहिती काढत असताना जवाहरनगर तुप्पा येथे मोहन कांबळे व गजानन नलेवाड या दोघांनी दुचाकी चोरी केल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन कांबळे आणि नलेवाड या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांनी पोलिसी खाक्या दाखवताच नऊ दुचाकी, एक जीप, एक सबमर्सिबल पंप असा २ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपीकडून नांदेड ग्रामीण ठाण्यांतर्गत सहा गुन्हे, वजिराबाद ठाण्यातील एक आणि धर्माबाद पोलीस ठाण्यांतर्गत एक गुन्हा उघडकीस आला आहे. या दोन्ही आरोपींना नांदेड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे, सहायक पोलीस निरीक्षक पी.डी. भारती, उपनिरीक्षक कल्याण नेहरकर, शहादेव खेडकर, पोहेकॉ कुलकर्णी, धोंडीराम केंद्रे, जांबळेकर आदींचा समावेश होता.
दरम्यान, जुन्या नांदेडातील सिद्धनाथपुरी येथून (एम.एच.२६-एच ३७७६) क्रमांकाचे चारचाकी वाहन १३ मेच्या रात्री चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी संजय आत्माराम वाघमारे यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.